वाशी : नेरुळमधील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शुक्रवारी सकाळ पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, संध्याकाळी व शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नेरुळ सेक्टर-४६ मधील अक्षर बिल्डिंगजवळील १७०० मि.मी. व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती होत असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी बसवण्यात आली आहे. नवीन जलवाहिनीस जुनी जलवाहिनी दोन्ही बाजूंनी जोडण्याचे काम शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू होणार असून, ते शनिवार पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे १८ तास मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नोडमध्ये यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, तसेच मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडणी अस-लेले क्षेत्र आणि सिडकोच्या खारघर व कामोठे पाणीपुरवठा पूर्णतः खंडित होणार आहे. १९ जुलैच्या संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळेपाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.