

पनवेल : सिडकोच्या बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होत असून, बंगळूरू येथून येणारे इंडिगोचे विमान हे विमानतळावर सकाळी ८ वाजता उतरणारे पहिले विमान ठरणार आहे.
देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता इंडिगोचे 6E 460 हे विमान बंगळूरू येथून दाखल होणार आहे. यानंतर सकाळी ८.४० वाजता इंडिगोचेच 6E 882 हे विमान हैदराबादकडे रवाना होणार असून, हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे पहिले विमान असेल.
पहिल्याच दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स नियोजित असून, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या चार विमान कंपन्यांच्या सेवा सुरू होणार आहेत. विमानतळ कार्यान्वित झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.
या ऐतिहासिक टप्प्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन सुरू होणे हे महाराष्ट्र शासन आणि सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतीक असल्याचे सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईसह पनवेल, रायगड, ठाणे, पुणे आणि कोकणातील नागरिकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.