

ठाणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणास जोरदार तयारी सुरू आहे. मात्र नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ३० सप्टेंबर रोजी मंजूर केले आहे.
संतप्त आगरी-कोळी समाजाने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ६ ऑक्टोबर रोजी दोन ते तीन लाख लोकांचा लॉंग मार्च काढण्याची घोषणा केली आहे. ही माहिती खासदार सुरेश म्हात्रे आणि सागरी संघटनांचे समन्वयक निलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. म्हात्रे यांनी इशारा दिला की, सरकारने परवानगी नाकारली तरी आंदोलन केले जाणार असून विमानतळ चालू देणार नाही.
नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावाने करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. खासदार म्हात्रे यांनी सांगितले की, संसदेच्या अधिवेशनातही हा विषय उठवला होता.
आगरी समाजाने ६ ऑक्टोबरच्या लॉंग मार्चसाठी सर्व पक्षीय नेते सहभागी होण्याचे आमंत्रण दिले असून मोर्चाचे नेतृत्व आवश्यक असल्यास मंत्री गणेश नाईक यांना दिले जाईल. खासदार म्हात्रे यांनी जेष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे आदर व्यक्त केला आणि फक्त समाजाचा अपमान होऊ नये असे स्पष्ट केले.
म्हात्रे यांनी इशारा दिला की, "लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव ठेवले नाही तर विमानतळ चालू होणार नाही." ७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात नामकरणाचा ठराव मंजूर करण्याची मागणीही केली जाणार आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकार दि. बा. पाटील यांच्याऐवजी तिसरेच नाव देण्याचा विचार करत असल्याचा आरोप खासदार म्हात्रे यांनी केला आहे.