

डोंबिवली : सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशांनुसार शनिवारी कल्याणात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २१ हजार १०८ थकीत मालमत्ता करदात्यांना दावा दाखल पूर्व प्रकरणाच्या (Pre litigation matters) नोटीसा सही व शिक्क्यासह प्रभागांमार्फत संबंधितांना वाटप करण्यास आल्या आहेत.
दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी २ हजार ९३० थकीत मालमत्ताधारकांनी मालमत्ता करापोटी येणे असलेली रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने करदात्यांसाठी मालमत्ता कर व पाणी पट्टीवरील व्याजमाफीची अभय योजना २०२४-२०२५ लागू केली आहे. अभय योजना २०२४-२०२५ ची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी जमा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत सर्व सावर्जनिक सुट्टीच्या दिवशी महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहे. थकीत मालमत्ता करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि आजच आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी ऑनलाईन किंवा जवळच्या नागरी सुविधा केंद्रात भरून महापालिकेस सहकार्य करण्यासह विकासाला हातभार लावावा, असे आवाहन कर निर्धारण आणि संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.