

ठाणे : लॉटरी कोणाला लागली? याचे आत्मपरीक्षण गणेश नाईक यांनी करावे. साठी बुद्धी नाठी असं म्हणतात, त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांनाच माहीत असा पलटवार खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर केला आहे . जर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती, त्यामुळे लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे याचीही आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली.
पालघर येथे स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लॉटरी म्हणून ते मुख्यमंत्री झाले असल्याचे सांगितले. परंतु त्यांना ते टिकविता आले नाही नसल्याची टीका केली होती. यानंतर पुन्हा शिंदे सेना आणि भाजपचे गणेश नाईक यांच्यातील कटुता पुन्हा एकदा समोर आली आहे.
शिंदे सेनेकडून सध्या नवी मुंबईत नाईक यांच्या विरोधात कुरघोडी वाढली आहे. त्यामुळे नाईक सध्या त्रस्त आहेत. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते शिंदे सेनेचा खरपूस समाचार घेत आहेत. अशातच त्यांनी पालघर मध्ये शिंदे यांच्यावर टीका करीत तोंड सुख घेतले. त्यानंतर ठाण्यात शनिवारी खासदार म्हस्के यांनी पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे हे सतत जिंकत आलेले आहेत, मात्र नाईक यांचा पराभव झाला आहे. आता ते पुन्हा निवडून आले आहेत. मात्र शिंदे यांनी उठाव केला नसता तर आज सत्ता सुद्धा आली नसती याची आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली. आनंद दिघे यांची ही मानाची हंडी आहे, इथून हंडीला सुरुवात झाली, ही पहिली हंडी जी दूरदर्शनवर दाखवली गेली, ही हंडी आनंद दिघे यांनी सुरू केली होती, आता एकनाथ शिंदे ही परंपरा चालवत असल्याचे म्हस्के यावेळी म्हणाले.