

ठाणे : मनुष्य प्राणी महत्त्वाचा की, भटके कुत्रे, भटके मांजर महत्त्वाचे ? असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी विचारला असुन हा विषय केंद्रीय स्तरावर निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत व्यक्त केले. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन व सहकार विभागाने आयोजित केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनात सोसायटीतील पाळीव प्राण्यांविषयी नियमावली बनवण्याचा ठराव सर्वसहमतीने मांडण्यात आला. त्यावर खा. म्हस्के यांनी वरील भाष्य केले.
ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित केलेल्या गृहनिर्माण संस्थाच्या तीन दिवसीय महाअधिवेशन आणि प्रदर्शनाला दुसर्या दिवशी हजारोंच्या संख्येने गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या महाअधिवेशनात ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सोसायट्याना नेहमी सतावणार्या पाळीव प्राण्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला. अधिवेशनात पाळीव प्राण्यांविषयी बोलायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाची गाइडलाईन पाळण्याचे निर्देश ठाणे मनपाने दिले. अनेक प्राणीमित्रांनी तर उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दाखले पाठवत कायद्यावर बोट ठेवल्याचे सांगितले. पाळीव प्राणी बाळगण्या बाबत अन्य रहिवाशी त्रस्त आहेत. पाळीव प्राण्यांच्या त्रासाबाबतच्या तक्रारी वाढत आहेत.
पाळीव प्राण्याचे पालक आणि तक्रारदार रहिवाश्यामध्ये यावरून नेहमीच खटके उडतात. तक्रार करायला गेल्यास पोलीस तक्रारदारालाच गुन्हेगार समजतात. पाळीव प्राण्यांबाबत आमच्या मनात कोणतीही अढी नाही, परंतू त्यांचा त्रास सर्वांना होत आहे. त्यामुळे सोसायटीत पाळीव प्राणी पाळण्याविषयाची नियमावली कायद्यात असायला हवी. प्राणी पाळण्याबाबतचा परवाना घेणे हा महापालिकेचा नियम आहे. परंतू, याकडे प्राणीप्रेमी दूर्लक्ष करताना दिसून येतात, याकडे सीताराम राणे यांनी लक्ष वेधले.
यावर अधिवेशनात संबोधित करताना खा. नरेश म्हस्के यांनी, मनुष्य प्राणी महत्त्वाचा की, भटके कुत्रे, मांजर महत्त्वाचे ? असा सवाल करून हा विषय केंद्रीय स्तरावर निश्चित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील 50 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास अळीनाशक औषधांची फवारणी करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रशासनाच्या फतव्याला गृहनिर्माण संस्थांनी विरोध दर्शवला आहे. पालिका सर्व प्रकारचे कर आकारते. मग हा फवारणीचा खर्च सोसायटयांच्या माथी का ? असा सवाल करून हौसिंग फेडरेशनच्या सीताराम राणे यांनी, गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर कुणीही हा खर्च करायची गरज नाही. असे स्पष्ट करीत महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याची तयारी दर्शिवली. या ठरावास खासदार नरेश म्हस्के,आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दर्शविला.