

शहापूर : झाडाच्या बुंध्याला विद्युत पोलच्या स्टे ची तारा गुंफून ठेवल्याने सदर तार झाडाच्या आतमध्ये जात चालली आहे. सदर तारेमुळे त्या झाडाला होणार्या वेदनांचे काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.
शहापूर तालुक्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या शहापूर - मुरबाड रस्त्यावरील शेणवा फिडरवरून आलेली 22 केव्हीची विद्युत वाहिनी गेली आहे. त्या विद्युत वाहिनीचा विद्युत पोल झुकू नये यासाठी त्या पोलला जमीनीत पोल पुरून स्टे दिला जातो. मात्र या ठिकाणी एका झाडाचा आधार घेऊन त्याच्या बुंध्याला तारेचा स्टे दिला आहे.
दरम्यान कोणत्याही प्रकारे झाडाला इजा केल्यास आणि तसे करणार्यावर कायद्याने गुन्हा नोंदवला जातो. तथापि तेथून अवघ्या 300 मीटर अंतरावर एक पॉवर हाऊस असूनही इतका मोठा निष्काळजीपणा याठिकाणी दिसून येतो. पर्यायाने खांब आणि तारा लावून ही वीजवाहिनी व्यवस्थित बांधली जावी. अनेकदा शॉर्टसर्किटमुळे आग लागून महावितरण व जनतेचे नुकसान होत असतानाही वीज विभागाचे कर्मचारी आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहात आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
व्यक्तिगत फायद्यासाठी झाडांना त्रास देणे तसेच झाडांच्या फांद्या तोडणे, झाडांवर खिळे ठोकून तसेच फलक, भित्तिपत्रके व जाहिराती लावल्यास पर्यायाने झाडाला कोणत्याही प्रकारे इजा केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
अनेक ठिकाणी उच्च व्होल्ट वीजवाहिन्या हिरव्या व सुकलेल्या झाडांवरून गेल्या आहेत. त्यामुळे कधीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर झाडाला बांधलेली तार तत्काळ काढून टाकावी.
विक्रांत मांजे, तालुकाध्यक्ष म.न.वि.सेना, शहापूर तालुका.
त्या जागेत स्टे टाकण्यासंबंधीची माहिती घेऊन कळवतो. त्या झाडाला बांधलेली वायर काढण्यास सांगण्यात येईल.
सुरज अंबुर्ले, सहाय्यक अभियंता, म.रा.वि.वि.कं.उपविभागीय कार्यालय, शहापूर.