

भाईंदर : राजू काळे
दहिसर ते भाईंदर मेट्रोसह अंधेरी ते दहिसर दरम्यानच्या मेट्रोच्या नियोजित कारशेडकडे जाणारा मेट्रो मार्ग कुठून जाणार, मेट्रो कारशेड कुठे साकारणार, हे सध्या संभ्रमावस्थेतील विषय ठरले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन दरम्यानच्या मुख्य मार्गावरून मेट्रो मार्ग नेण्यास स्थानिकांचा विरोध आहे. तर त्याला पर्याय म्हणून मुर्धा, राई व मोर्वा गावांच्या मागून मेट्रो मार्ग गेल्यास त्याचा सर्वाधिक फायदा येथील विकासकांना होणार आहे. या मार्गामुळे जमिनींना सोन्याचे दर मिळणार आहेत.
दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या डिसेंबर 2025 अखेर पर्यंत सुरू होणार असून दुसरा टप्पा डिसेंबर 2026 अखेर पर्यंत सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मेट्रो मार्ग सुरू होण्यापूर्वी या मेट्रो प्रकल्पासह अंधेरी ते दहिसर मेट्रोसाठी आवश्यक ठरणार्या कारशेडच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
कारशेडसाठी दोन जागांचा पर्याय राज्य सरकार व एमएमआरडीए समोर आहे. एक म्हणजे उत्तनच्या डोंगरी परिसरातील सर्वे क्रमांक 19 वरील 59 हेक्टर शासकिय जागा व दुसरी म्हणजे मोर्वा गावाजवळील खोपरा गावात खासगी मालकीची 100 एकर जागा. डोंगरी येथील जागा एमएमआरडीएने निश्चित केली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी कारशेड साकारण्यापूर्वी तेथील सुमारे 12 हजार झाडे काढावी लागणार आहेत. त्याला स्थानिकांसह वृक्ष प्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याला पर्याय म्हणून खोपरा गावातील खाजगी जागा मालकांनी आपली 100 एकर जागा कारशेडसाठी देण्याची तयारी दर्शविली आहे.
येथील कारशेडसाठी झाडे काढण्याची आवश्यकता नसल्याचा दावा त्या जागा मालकांनी केला असून त्या जागांपोटी रेडीरेकनर प्रमाणे मोबदला देण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनापुढे ठेवला आहे. यामुळे बुचकळ्यात पडलेल्या शासनाने तूर्तास या कारशेडकडे जाणार्या मेट्रो मार्गावर देखील अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.
सुरुवातीला हा मेट्रो मार्ग नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून मुख्य मार्गावरून प्रस्तावित करण्यात आला होता. त्यात मुर्धा, राई, मोर्वा गावांतील स्थानिकांच्या जागा, घरे व शेती मोठ्याप्रमाणात बाधित होत असल्याने त्यांनी या मार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याला पर्याय म्हणून गावांमागून शहर विकास आराखड्यात प्रस्तावित असलेला 18 मीटर रस्त्यावरून मेट्रो नेण्याची सूचना स्थानिकांकडून शासनाला करण्यात आली आहे. या मार्गावरून मेट्रो मार्ग गेल्यास त्याचा सर्वाधिक फायदा येथील जमीन मालक बनलेल्या विकासकांना होणार आहे. जमिनींना सोन्याचे दर मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
कारशेडला सुरुवात होणे आवश्यक
दरम्यान राज्य शासन कोणता निर्णय घेणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी कारशेड कोणत्या जागी साकारणार, ही बाब देखील गोपनीय आहे. दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग सुरू होण्यापूर्वी मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. यामुळे राज्य शासनाला लवकर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.