Murbad Water Crisis: मुरबाडच्या तहानलेल्या मातीत बैलगाडा संघटनेचे 200 टँकर धावले

शर्यतीचा थरार बाजूला ठेवत बैलगाडाप्रेमी उतरले जलसेवेसाठी; बैलप्रेमींच्या जलसंकल्पात पाण्याची भेट
Murbad Water Crisis
Murbad Water CrisisPudhari
Published on
Updated on

नेवाळी : मुरबाड तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत मोठा निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांसह आदिवासी पाड्यांसाठी तब्बल 200 पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचा संकल्प संघटनेने जाहीर केला असून या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संघटनेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवर टँकर पोहोचण्यास देखील सुरुवात झाली आहे.

उन्हाच्या तीव्र झळांमुळे मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये आणि दुर्गम आदिवासी वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महिलांना आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे.

Murbad Water Crisis
Vangani Illegal Chawl Action: वांगणीत 100 हून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त; महसूल विभागाची धडक कारवाई

संघटनेच्या वतीने ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यातील बैलगाडा मालक, चालक, शौकिन, व्यावसायिक आणि बैलगाडा प्रेमी बांधवांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संघटनेने जाहीर केलेल्या मदतीनंतर काही भागांमध्ये पाण्याचे टँकर पोहोचण्यासही सुरुवात झाली असून आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना त्याचा दिलासा मिळू लागला आहे.

Murbad Water Crisis
Water Metro Project: जल मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो मुंबईत

बैलगाडा शर्यतींसाठी ओळखली जाणारी संघटना आता सामाजिक कार्यातही पुढाकार घेत असल्याने या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “पाणी हेच जीवन“ हा संदेश देत तहानलेल्या गावांना मदत करण्यासाठी उभारलेला हा उपक्रम समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

पाणी टंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीत उतरलेली बैलगाडा संघटना ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरत असून, आगामी काळात आणखी नागरिक आणि संस्था या मोहिमेत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुरबाडच्या तहानलेल्या भूमीला दिलासा देण्यासाठी उचललेले हे पाऊल सामाजिक ऐक्य आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news