Murbad shepherd migration: चारा-पाण्यासाठी घाटमाथ्यावरून मुरबाडकडे मेंढपाळांचा संघर्षमय प्रवास

मेंढ्यांच्या कळपांसह स्थलांतरित : उघड्यावरच संसार, निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते
Murbad shepherd migration
Murbad shepherd migrationPudhari
Published on
Updated on

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: घाटमाथ्यावरील दुर्गम भागातून दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाळांचे कुटुंबीय आपल्या मेंढ्यांच्या कळपांसह मुरबाडकडे स्थलांतरित झाले असून, तालुक्यातील माळराने, नदीकाठ आणि मोकळ्या जागांवर त्यांच्या कळपांचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. हिरव्यागार माळावर विसावलेले शेकडो मेंढ्यांचे कळप आणि त्यांच्या सोबत चालणारा हा प्रवास नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पारंपरिक मेंढपाळी व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे हे मेंढपाळ वर्षानुवर्षे निसर्गाच्या लहरींवर अवलंबून राहून स्थलांतर करतात. घाटमाथ्यावर चाऱ्याची टंचाई निर्माण होताच, कुटुंबीय, लहान मुले, खेचरे (सामान वाहून नेण्यासाठी) आणि संरक्षणासाठी कुत्र्यांसह ते लांबचा प्रवास करत खालील भागांकडे मार्गस्थ होतात. हा प्रवास केवळ स्थलांतर नसून त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे.

Murbad shepherd migration
Palghar News: शिक्षकाचे काम पालघरात पगार मोखाड्यात

या मेंढपाळांचे जीवन अत्यंत कठीण आणि संघर्षमय आहे. उघड्यावरच त्यांचा संसार मांडलेला असतो. निळ्या आभाळाखालीच त्यांचा विसावा, तर माळरानावरच त्यांचे जगणे घडत असते. पावसाळा, उन्हाळा किंवा थंडी, प्रत्येक ऋतूत ते निसर्गाशी दोन हात करत आपला व्यवसाय टिकवून ठेवतात. विशेष म्हणजे, मेंढ्यांचे प्रजननही या प्रवासादरम्यानच होत असते, त्यामुळे कळपाची संख्या सतत वाढत राहते.

वाहतुकीवर परिणाम...

या स्थलांतराचा परिणाम काही प्रमाणात वाहतुकीवरही होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यालगत अचानक येणारे मेंढ्यांचे कळप वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे चालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Murbad shepherd migration
RTE Admission: पालघरात आरचटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ; उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांचे प्रमाण घटले

मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यातील नाते...

मुरबाड परिसरातील मोकळी जमीन, उपलब्ध चारा आणि पाण्याचे स्रोत यामुळे मेंढपाळ काही दिवस येथे मुक्काम करतात. या दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्यांना बसवून नैसर्गिक खताचा उपयोग करून शेती सुपीक करण्यासही ते हातभार लावतात. त्यामुळे मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यात परस्पर सहकार्याचे नाते निर्माण झालेले दिसते.

निसर्गाशी नाते जपणारी जीवनशैली...

सामाजिक कार्यकर्त्यांकडून मेंढपाळांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित मुक्कामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावातही पारंपरिक मेंढपाळी व्यवसाय टिकून असल्याचे हे जिवंत उदाहरण असून, निसर्गाशी नाते जपणारी ही जीवनशैली आजही तितक्याच ताकदीने उभी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news