

किशोर गायकवाड
मुरबाड शहर: मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक रामचंद्र भगवान दुधाळे यांच्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ लाख रुपयांची रोकड आणि जमिनीची महत्त्वाची कागदपत्रे असलेली ब्रिफकेस चोरून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या गेटसमोरील भिंत्तीजवळ घडली असून याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुधाळे यांनी दिलेल्या प्रथम खबर
अहवालानुसार, जमिनीचे रजिस्ट्रेशन सकाळी मुरबाड तहसीलदार कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात होणार होते. त्यासाठी त्यांनी ५०० रुपयांच्या नोटांची बंडले असलेली एकूण ९ लाख रुपयांची रोकड, जमिनीची कागदपत्रे आणि बँकेचे चेकबुक नेहमीप्रमाणे आपल्या ब्रिफकेसमध्ये ठेवले होते. सकाळी दुधाळे हे पत्नीसह आपल्या कारने घरून निघाले.
वडवली येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावून ते सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयात पोहोचले असता त्यांनी आपली कार गेटसमोरील भिंतीजवळ पार्क केली. रजिस्ट्रेशनला वेळ असल्याने त्यांनी मुलाला कार घेऊन घरी जाण्यास व कार चार्ज करून परत येण्यास सांगितले. वेंडरच्या दुकानात पेपर तयार करण्यासाठी थांबले.
दरम्यान, काही कारणास्तव नियोजित रजिस्ट्रेशन रद्द झाल्याचा फोन आल्याने दुधाळे हे मुलाने आणलेली दुचाकी घेऊन नगरपंचायतीच्या कामासाठी निघून गेले. रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांनी कारची डिकी उघडून पाहिली असता, ९ लाख रुपयांची ब्रिफकेस गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोध घेऊनही बॅग न मिळाल्याने ३ नोव्हेंबर रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.