

भाईंदर : राजू काळे
काशिमीरा येथील माशाचा पाडा परिसरात पालिका मराठी शाळा, एमआयटी इंटरनॅशनल स्कुलच्या सुमारे 150 मीटर परिघात तब्बल 5 आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट सुरु आहेत. 2016 मधील शासकीय नियमानुसार असे प्लांट शाळा महाविद्यालये, न्यायालय परिसरात सुरु करता येत नाहीत. असे असतानाही हे प्लांट सुरु असल्याचा साक्षात्कार होताच पालिकेने एकूण 5 पैकी 3 प्लांट बंद करण्याचे आदेश जारी केल्याचे समोर आले आहे.
मिरा-भाईंदर शहरात धुळीचे साम्राज्य पसरण्यास येथील आरएमसी प्लांट्स सह मोठ्याप्रमाणात सुरु असलेली बांधकामे, खोदकामे व बेकायदेशीर माती भराव कारणीभूत ठरत आहेत. मात्र त्यावर पालिकेसह पोलीस व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासियांना धूळयुक्त वातावरणातच जीवन जगावे लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यावर तत्कालीन आयुक्तांनी नियमावली जारी करीत विविध ठिकाणचे आरएमसी प्लांट्स, बांधकाम व्यावसायिक आदींना नोटीसा बजावून वातावरणात धूळ उडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. मात्र हे कागदी निर्देश हवेतच विरळ झाल्याने शहरात अद्यापही धुळीचे साम्राज्य पसरत असल्याचे अनुभवयास मिळते.
यातील आरएमसी प्लांटमधील धूळ मोठ्याप्रमाणात वातावरणात पसरत असल्याने असे प्लांट बंद करण्याबाबतच्या नोटीसा देखील प्रशासनाकडून काढण्यात आल्या होत्या. काही आरएमसी प्लांट्स बंद केल्यानंतरही ते दिवसा बंद तर रात्रीच्या काळोखात सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. असे अनेक प्लांट घोडबंदर व काशिमीरा येथील माशाचा पाडा परिसरात सुरु आहेत. यापैकी माशाचा पाडा परिसरात तब्बल 5 आरएमसी प्लांट्स सुमारे 150 मीटर परिघात सुरु असून हे प्लांट्स चक्क पालिकेची मराठी शाळा व एमआयटी इंटरनॅशन शाळेपासून हाकेच्या अंतरावर सुरु असल्याचे समोर आले आहे.
या प्लांट्समुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने स्थानिकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आरएमसी प्लांट संदर्भात 10 नोव्हेंबर 2016 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये जारी केलेल्या अधिसूचनेत आरएमसी प्लांटच्या 200 मीटर परिघात शाळा, महाविद्यालये, न्यायालय असल्यास आरएमसी प्लांटला परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
असे असतानाही हे प्लांट्स शाळांच्या प्रतिबंधित क्षेत्रात राजरोसपणे सुरु असल्याचे समोर आले असताना पालिकेला आपल्या चुकीचा साक्षात्कार होताच माशाचा पाडा परिसरातील 5 पैकी 3 आरएमसी प्लांट्स बंद करण्याचे आदेश सोमवारी जारी करण्यात आल्याचे समोर आले. हे आदेश संबंधित प्लांट मालक वा चालकांना बजाविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ते बंद करण्यात आले आहेत किंवा नाही, याची खातरजमा पालिकेकडून अद्यापही करण्यात आलेली नाही.
स्थानिकांना धूळमुक्त वातावरणात राहू द्यावे
प्लांट बंद करण्याच्या आदेशात मेसर्स स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर आरएमसी, मेसर्स के. के. जी. आरएमसी इन्फ्रा प्रा. लि. व मेसर्स काँक्रीटेक इंडिया आरएमसी या प्लांट्सचा समावेश आहे. तर उर्वरीत मेसर्स आरडीसी आरएमसी प्लांट पालिकेकडून 12 फेब्रुवारी रोजी सील करून त्याचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी प्लांट चालकाशी आर्थिक तडजोड करून तो प्लांट पुन्हा सुरु केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तर मेसर्स गजानन आरएमसी प्लांट अद्याप सुरु असून त्यावर पालिकेने अद्याप कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेने तीन आरएमसी प्लांट बंद केल्याने स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी उर्वरीत दोन प्लांट देखील तात्काळ बंद करून स्थानिकांना धूळमुक्त वातावरणात राहू द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
माशाचा पाडा परिसरातील शाळांच्या प्रतिबंधित क्षेत्रात आरएमसी प्लांट सुरु असल्याने त्याठिकाणी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शाळांच्या प्रतिबंधित क्षेत्रात सुरु असलेले आरएमसी प्लांट्स तात्काळ बंद करण्याबाबत पालिकेला सतत पत्रव्यवहार केला. मात्र पालिकेने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार पालिकेने तात्काळ कार्यवाही करीत एकूण 5 पैकी 3 आरएमसी प्लांट्स बंद करण्याचे आदेश काढले आहेत. तर उर्वरीत 2 आरएमसी प्लांट्स देखील बंद करण्याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
रामभवन शर्मा, उपजिल्हा प्रमुख, मिरा-भाईंदर शिवसेना (शिंदे)