

डोंबिवली : मतदार यादीतील बोगस आणि डुप्लिकेट नोंदी हटविण्यासाठी सुरू असलेल्या एसआयआर अभियानावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी कल्याणमध्ये खळबळजनक गौप्यस्फोट केले. मुंब्रा परिसरात तब्बल ४० हजार बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार याद्यांमध्ये घुसडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सोमय्या यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, काही मशिदींमधून बोगस मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ही फक्त यादी दुरूस्ती नाही तर लोकशाही स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सोमय्या म्हणाले. मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावे वगळणे, स्थलांतरितांच्या नोंदी काढणे आणि नवमतदारांची नोंद करणे ही अभियानाची प्राधान्ये असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीचे शुद्धीकरण हीच काळाची गरज
निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह ठेवण्यासाठी प्रत्येक बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्याने सक्रिय राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. या प्रक्रियेत एकही अपात्र व्यक्तीची नोंद होणार नाही आणि एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश सोमय्या यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले. देशाची सुरक्षा आणि स्वच्छ प्रशासनासाठी मतदार यादीचे शुद्धीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगत सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना मोहीम जोमाने राबविण्याचे आवाहन केले.