

शहापूर : शहापूरसह तालुक्यातील गावखेड्यांत गल्लीबोळांसह भंगारच्या दुकानांच्या ठिकाणी कचर्याचे ढिगारे साचले जात आहेत. तेथे दररोज कचरा व टायर जाळले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण निर्माण झाले आहे. याचा परिणाम नागरिकांसह प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे.
दरम्यान टायर जाळले जात असल्याने प्रदूषणात मोठी भर घातली जात असून, चालू वर्षात तालुक्यातील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर याबाबत भंगार दुकानदार तसेच जागरूक नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत असून याबाबत संबंधित मंडळाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
शहापूर तालुक्यातील आटगाव, वासिंद परिसर तसेच किन्हवली व मुरबाड रस्त्यालगत असलेल्या अनेक ठिकाणी सकाळच्या वेळेस टायर व प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात पेटवला जातो. तर कारखान्यांमधून धुराचे लोट निघत असून यामुळे पशु-पक्षांच्या जीवनावर दुष्परिणाम होतोच शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
शहापूर तालुक्यात विविध ठिकाणी बिनदिक्कतपणे टायर व कचरा पेटवला जात असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. पेटवलेल्या कचर्यामुळे वणवेही लागत असल्याचे वन अधिकारी व कर्मचार्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या काळात वायू प्रदूषणामुळे आरोग्यविषयक तक्रारीही वाढल्या आहेत.
हवा प्रदूषित होण्यामुळे फक्त फुफ्फुसांवरच परिणाम होत नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. प्रदूषित हवेतील सूक्ष्म कण, नायट्रोजन डायऑक्साइड, ओझोन आणि कार्बन मोनोऑक्साइड हे घटक हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. दरम्यान वायू प्रदूषणाने हृदयाच्या आरोग्यास धोका उद्भवतो. वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे हाच यावर उपाय ठरू शकतो.
तालुक्यातील विविध भागात कचरा व टायर पेटवण्याचे काम सुरू असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण उपविभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका पाहता लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले पाहिजे.
सुरेश पाटील, अध्यक्ष, पर्यावरण सामाजिक संस्था.