

भाईंदर : यंदा आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी 5 हजार 200 ज्यादा बसेस सोडल्या होत्या. त्याचा फायदा तब्बल 9 लाख 71 हजार 683 भक्तांनी घेतला. त्यातून एसटीला 35 कोटी 87 लाख 61 हजारांचे उत्पन्न मिळाले जे गतवर्षीपेक्षा अधिक असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या सर्व प्रवाशांची एसटीच्या चालक, वाहकांनी सुरक्षितपणे ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक वारीसाठी येत असतात.
या भाविकांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी यंदा एसटीने 3 ते 10 जुलै दरम्यान तब्बल 5 हजार 200 ज्यादा बसेस सोडल्या होत्या. या बसेसनी 21 हजार 499 फेर्या करून तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविकांची सुरक्षित ने-आण केली. त्यातून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी जास्त असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. गतवर्षी आषाढी यात्रेतील प्रवासी वाहतुकीतून एसटीला एकूण 28 कोटी 91 लाख 58 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. त्यात यंदा 6 कोटींपेक्षा अधिक वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.एकूणच एसटीच्या माध्यमातून लाखो भाविकांना विठुुरायाचे दर्शन घेणे सोपे झाले आहे.
या प्रवासी वाहतुकीदरम्यान संबंधित एसटी महामंडळाचे कर्मचारी ऊन, वारा, पावसाची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य बजावित असतात. या कर्मचार्यांची आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, यासाठी यंदा परिवहन मंत्र्यांनी स्वखर्चाने 5 ते 7 जुलै या सलग तीन दिवस एसटीच्या सर्व कर्मचार्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था एकादशीच्या उपवासाच्या पदार्थासह पंढरपूर येथे केली होती. या कर्मचार्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून सुरक्षितपणे यांना परत आणल्याने असे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदनास पात्र असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले.