Shrikant Shinde: राजकीय कमानींना खासदार श्रीकांत शिंदेंचा चाप; रस्त्यावर कमानी न उभारण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

सणासुदीच्या काळातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय; अन्य राजकीय पक्षांनीही अनुकरण करण्याची नागरिकांची अपेक्षा
Shrikant Shinde
Shrikant Shinde
Published on
Updated on

Shrikant Shinde

कल्याण : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असताना कल्याण-डोंबिवली शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच सण, उत्सव आणि वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी रस्त्यांवर उभारण्यात येणारे बॅनर, होर्डिंग आणि राजकीय कमानी यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजकीय कमानी उभारण्याला चाप लावला आहे. रस्त्यावर राजकीय कमानी उभारू नयेत, अशा सूचना त्यांनी शिंदेसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. विशेषतः अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून, काही कामे अद्याप प्रगतिपथावर आहेत. त्यातच कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्ते अरुंद असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांसह मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून डोंबिवलीत येणाऱ्या नागरिकांनाही बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे पाहुण्यांकडे ये-जा करण्याचेही अनेकजण टाळत असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीचा प्रवास म्हणजे त्रासदायक अनुभव, अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी दहीहंडी उत्सवापासून सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापर्यंत विविध राजकीय पक्षांकडून शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यांवर कमानी उभारण्याची चढाओढ पाहायला मिळते. अनेकदा या कमानी दिवाळीपर्यंत कायम राहतात. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर कमानींमुळे आणखी जागा व्यापली जाते आणि परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातून वाहतूक कोंडीबरोबरच शहराच्या विद्रूपीकरणाची समस्याही निर्माण होते.

वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदेसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रस्त्यावर राजकीय कमानी उभारू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाचे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

दरम्यान, अन्य राजकीय पक्षांनीही या निर्णयाचे अनुकरण करून रस्त्यांवरील अनावश्यक कमानी उभारणे टाळल्यास कल्याण-डोंबिवली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news