

पनवेल (ठाणे) : पनवेल शहरालगत असलेल्या मोब्रे गावातील मोब्रे धरण पुन्हा एकदा गळतीमुळे चर्चेत आले आहे. दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून या धरणाची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, यावर्षी पुन्हा विविध ठिकाणी गळती सुरू झाल्याने प्रशासनाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोब्रे धरणाचा उपयोग शेजारील गावांतील शेती आणि काही प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी होतो. त्यामुळे या धरणातून होणारी गळती ही शेतकर्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब आहे. धरणातील पाणीसाठा साचण्याऐवजी झिरपत असल्याने भविष्यातील सिंचन व्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2022-23 मध्ये पावसाळ्यापूर्वी या धरणाच्या डागडूजीत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला होता. मात्र, केवळ एका हंगामातच धरणात पुन्हा गळती सुरू झाल्याने, केलेल्या कामाचा दर्जा हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, धरणाच्या गळतीचे त्वरित निराकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पावसाळा सुरू होत असतानाच गळती उघडकीस आल्याने भविष्यात धरणावर ताण वाढल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गळतीमुळे होणारे जलनुकसान व संभाव्य धोका यासाठी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.