

ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, हिंदी भाषा सक्तीची केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश जारी केला आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ठाण्यातील शासकीय विश्रामगृहासमोर अध्यादेश फाडून राज्य सरकारचा शुक्रवारी निषेध व्यक्त केला.
राज्य शासनाने शाळांमध्ये पहिलीपासून पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली आहे. त्यामुळे आक्रमक धाेरण स्विकारात मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ठाणे विश्रामगृहसमोर तीव्र आंदोलन करून राज्य शासनाचा अध्यादेश फाडून निषेध व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसैनिकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शहर अध्यक्ष मोरे म्हणाले की, इतर राज्यांमध्ये त्यांचीच राज्यभाषा ही महत्त्वाची मानले जाते. परंतु आमच्या राज्यांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य का द्यावे? आम्ही राज्य शासनाने लादलेली ही सक्ती कधीच मान्य करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी मराठी भाषा आणि माणसाच्या पाठीशी असल्याचे माेरे यांनी स्पष्ट केले.