MNS Pothole Protest | मनसेचा 'खड्डे'प्रहार! प्रशासनाला गंभीर इशारा, अन्यथा तीव्र आंदोलनाची शक्यता...

Road Condition Protest | सत्ताधीशांचा निषेध नोंदविण्यासाठी खड्ड्यांत बसून भजन व पूजन
MNS Pothole Protest
MNS Pothole Protest(Pudhari File Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येत्या बुधवारी २७ तारखेला बाप्पा स्थानापन्न होणार आहेत. तथापी प्रशासनाकडून रस्त्यांतील खड्डे बुजविण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने त्रस्त कल्याण-डोंबिवलीकरांच्यावतीने राजसैनिकांनी शनिवारी डोंबिवलीतील भरचौकात उतरून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. यावेळी प्रशासनासह सत्ताधीशांचा निषेध नोंदविण्यासाठी खड्ड्यांत बसून भजन व पूजन केले.

यावेळी आंदोलनकर्त्या राजसैनिकांनी एमएमआरडीएचे अधिकारी राजेंद्र देवरे यांना घेराव घातला. रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टा यावर अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळावे, या मागणीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या टिळक रोडवरील खड्डेग्रस्त ताई पिंगळे चौकात भजन-कीर्तन करत आंदोलन केले.

MNS Pothole Protest
Thane News : अनधिकृत बांधकामांच्या 134 नळजोडण्या खंडित

आंदोलनादरम्यान राजसैनिकांनी एमएमआरडीएचे अधिकारी राजेंद्र देवरे यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अशा रस्त्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याण, तर सांस्कृतिक नगरीचे वलय लाभलेल्या डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण पट्ट्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असतानाही शासन/प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

MNS Pothole Protest
Thane News : पालिकेतील 2 कर्मचारी घेतात दुहेरी वेतन

याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, शहराध्यक्ष राहुल कामत, शहराध्यक्षा मंदा पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहराध्यक्ष श्रीकांत वारंगे, दीपक शिंदे, प्रेम पाटील, निषाद पाटील, प्रभाकर जाधव, शहर संघटक स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे, विभागाध्यक्ष रवी गरुड, ऋतीकेश गवळी, कदम भोईर, प्रदीप चौधरी, संजय चव्हाण, रक्षीत गायकर, महेंद्र कुंदे आदी पदाधिकारी आणि राजसैनिकांनी चौकात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या समाधानासाठी एमएमआरडीएचे अधिकारी राजेंद्र देवरे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तथापी अशी फेकाफेक करणारी उत्तरे नकोत, तर कृती करा, असे ठणकावून सांगत राजसैनिकांनी समाधानकारक उत्तरे देण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकारी देवरे यांना घेराव घातला. मात्र परिस्थिती ताणली जाऊ नये, यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले.

कल्याण-डोंबिवलीकरांच्या पाचवीला खड्डे पुजले आहेत. एखाद्या रस्त्याचे काम केले की तेथे सत्ताधारी आपल्या छबी आणि नावाचा उल्लेख करत फलक/होर्डिंग्ज लावतात. मात्र संबंधित रस्त्याची दुरावस्था झाल्यानंतर त्यावर पडलेल्या खड्ड्यात आदळून एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. कल्याण-डोंबिवलीकर हे किती वर्ष सहन करणार ? असा सवाल उपस्थित करत जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी शासन/प्रशासनासह सत्ताधीशांवर खापर फोडले. येत्या चोवीस तासांत कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांचे सपाटीकरण झाले नाही तर मात्र आंदोलनाचा भडका उडवून देण्याचा इशारा आंदोलनकर्त्या राजसैनिकांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news