

मिरा रोड: मिरा रोड येथील सिल्व्हर पार्क परिसरातील नैवेद्य लॉजिंग अँड बोर्डिंगवर छापा टाकून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक व विशेष बाल संरक्षण कक्षाने देहव्यापार प्रकरणाचा पर्दाफाश केला.
या कारवाईत तबस्सुम उर्फ सोनिया उमर कुरेशी (३९) हिला अटक करण्यात आली असून, ३३ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील रमेश कुमार या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. यावेळी महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारताना तबस्सुम उर्फ सोनिया हिला पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि स्त्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जिलानी सय्यद पुढील तपास करीत आहेत.