

भाईंदर (ठाणे ) : मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयातील स्थायी सभागृहात सर्व पक्षीयांच्या बैठकीत माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना पिण्यासाठी देण्यात आलेले पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले. मुख्यालयात दूषित पाणी आढळून आल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
याबाबत तक्रार केल्यानंतर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी त्याची गंभीर दखल घेत पाणीपुरवठा विभागातील संबंधित शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व शिपायांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसांच्या अनुषंगाने संबंधितांकडून प्राप्त होणाऱ्या खुलाशावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. प्राधिकरणाकडून शहराला केला जाणारा पाणीपुरवठा शुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच शहराला शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा शहराला उपलब्ध होत असताना त्याचे टप्प्याटप्प्याने क्लोरीनेशन केले जाते. तसेच शहरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांमध्ये सुद्धा अतिरिक्त क्लोरिनेशन केले जाते.
माजी महापौरांच्या तक्रारीची दखल
भाईंदर फाटक येथील मुख्य टैंकर पॉईंट तसेच शहरातील सर्व जलकुंभांमधील पाण्याचे क्लोरिनेशन करून त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. या प्रक्रिया पूर्ण करूनच शहरात नियमित शुद्ध पाणीपुरवठा होतो. यानुसार शहरात तसेच पालिका कार्यालयांत शुद्ध पाणी पुरवठा होणे अपेक्षित असतानाही पालिका मुख्यालयात दूषित पाणी आढळून आल्याने त्याविरोधात माजी महापौरांनी केलेल्या तक्रारीनुसार आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.