Chlorinated water in Mira Bhayandar : पिण्याच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा वाढली?
भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेला पाणीपुरवठा करणार्या एमआयडीसी व स्टेम प्राधिकरणाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यात क्लोरीनची मात्रा वाढविली असून पालिकेने देखील पाणी शुद्ध करण्याच्या अनुषंगाने पाण्यात क्लोरीनचा वापर वाढविल्याने पिण्याच्या पाण्याला गेल्या दोन दिवसांपासून क्लोरीनची चव येऊ लागली आहे. यामुळे नागरीकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीकोनातून संभ्रम निर्माण निर्माण झाला आहे
क्लोरीनचा वापर प्रामुख्याने पाण्याच्या शुद्धीकरणासाठी केला जात असला तरी त्याचे पाण्यातील प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. या घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा करणार्या यंत्रणांकडून पाण्यात क्लोरीनची मात्रा वाढविली जाते. तसेच काही स्थानिक प्रशासनाकडून देखील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा टाळण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. मात्र या क्लोरीनचा वापर निश्चित मात्रापेक्षा जास्त झाल्यास पाण्याला क्लोरीनची चव येऊ लागते. गढूळ पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन सर्व स्थानिक प्रशासनांकडून करण्यात येत असले तरी अनेकांच्या घरांमध्ये सध्या वॉटर प्युरिफायर बसविल्याचे दिसून येते.
निश्चित प्रमाणातच क्लोरिनचा वापर हवा
क्लोरीन हे शास्त्रीय दृष्ट्या एकप्रकारचे आम्लच आहे. पिण्याच्या पाण्यात क्लोरीनची मात्रा निश्चित प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास त्याचा परिणाम शरीरातील आतड्या व त्वचावर होण्याची शक्यता असते. तसेच पाणी डोळ्याला लागल्यास डोळ्यांची जळजळ होते. शरीरातील चांगले जंतू देखील मरतात व केस गळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून सांगण्यात आले. यामुळे पिण्याच्या पाण्यात निश्चित प्रमाणातच क्लोरीनचा वापर करण्याची मागणी लोकांकडून होऊ लागली आहे.
