

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवि व्यास यांनी केला आहे. या खड्ड्यांचे गांभीर्य ओळखून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून खड्ड्यांचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात दाखल केले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह वाहनचालक, पादचारी, रुग्ण आदींना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असून वाहनांचे देखील नुकसान करणारे ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचे चाक खड्ड्यात जाऊन ते मोडल्याची घटना घडली. तत्पूर्वी एका तरुणीचा खड्ड्यामुळे जीव गेल्याची घटना घडल्याने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे किती जीवघेणे आहेत, यावरून लक्षात येत असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे.
शहरात सध्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू असून या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतूक होत आहे. यामुळे येथील रस्ते मोठ्याप्रमाणात उखडल्याने येथून वाहतूक करणे त्रासदायक ठरू लागले आहे. त्याची जबाबदारी मेट्रो ठेकेदारासह एमएमआरडीएची असली तरी ते खड्डे तात्काळ दुरुस्त करून वाहनचालक व प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, यासाठी पालिकेने त्यावर वेळोवेळी नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे.
पालिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे. याचप्रमाणे पालिका हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुद्धा मोठमोठे खड्डे पडले असून त्यात एखादे अवजड वाहन आदळून ते पलटी झाल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी पालिकेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर देखील खड्डे दुरुस्तीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याची सूचना व्यास यांनी केली आहे. याखेरीज पालिका अखत्यारीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर मोहीम सुरु करावी जेणेकरून ऐन पावसाळ्यात खड्डेमुक्त वाहतूक करणे सुलभ होईल.
पालिकेने या खड्डे दुरुस्तीच्या कामांसाठी एक कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याचे काटेकोरपणे पालन करावे. पालिकेने तक्रारीसाठी चॅट बॉटची सुविधा नागरीकांना उपलब्ध करून दिली असल्याने त्याद्वारे खड्ड्यांसंबंधी प्राप्त तक्रारींचे तात्काळ निवारण करून तेथील खड्डे दुरुस्ती करण्यात यावी. अशा तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वतः ग्राऊंड लेव्हलवर खड्ड्यांच्या ठिकाणची पाहणी करून तेथील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना निर्देश द्यावेत, अशी सूचना व्यास यांनी केली आहे.
मात्र शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्याचा त्रास सामान्यांना मोठ्याप्रमाणात होऊ लागल्याने व्यास यांनी खड्ड्यांप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांच्य्या कोर्टात तक्रार केली आहे. हि खड्डे दुरुस्ती लवकरात लवकर तसेच गणेशोत्सव सुरु होण्याच्या 15 दिवसांअगोदर पूर्ण करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांकडून केलेल्या कामांचा अहवाल मागवावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्रांकडे केली आहे.