

डोंबिवली : डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर एक्स्प्रेस मेलच्या बाथरुममध्ये बलात्कार करणार्या नराधमाला अखेर अटक करण्यात आली आहे. गजानन चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे. या अल्पवयीन मुलीवर डोंबिवलीत आणखी एका तरुणाने बलात्कार केला होता. त्या प्रकरणाचा तपास डोंबिवलीचे पोलिस करत आहेत.
गजानन शिवदास चव्हाण (30) हा नराधम मुळचा अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील शेकापुर गावचा रहिवासी आहे. यापूर्वी तो कल्याणमध्ये राहात होता. तो अकोल्याहून पुन्हा कामाच्या शोधात कल्याणला आला होता. त्याची कल्याण रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्याने या मुलीशी मैत्री केली. तिला फूस लावून अकोल्याला जाऊ अशी थाप मारली. त्यानंतर त्याने या मुलीला कल्याणात राहणार्या भावाच्या घरी नेले.
कल्याण-टिटवाळा लोकलने, त्यानंतर टिटवाळा-कसारा लोकलने कसार्यात नेले. तेथून दोघेही अकोल्याला जाणार्या एक्स्प्रेसमध्ये चढले. प्रवासाच्या दरम्यान आरोपीने मुलीला एक्स्प्रेसमधील बाथरूममध्ये नेले. कसारा ते अकोला रेल्वे स्थानकांच्या दरम्यान त्याने या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला एसटीने अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील शेकापुर गावच्या घरी घेऊन गेला. त्याने घरच्यांना ही मुलगी माझी मैत्रिण असल्याची थाप मारली. त्यानंतर आरोपीला त्याच्या आई-वडिलांनी मुलीला तिच्या घरी सोडून येण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी मुलीला घेऊन पुन्हा अकोला रेल्वे स्टेशनवर आला. तथापी त्याने अकोला रेल्वे स्टेशनवर मुलीला सोडून पळ काढला. पिडीत मुलीने तिच्या बाबतीत घडलेली सर्व माहिती अकोला लोहमार्ग पोलिसांपुढे कथन केली. या प्रकरणाचा तपास कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या पथकाने या प्रकरणाचा चौकस तपास केला. घटनास्थळांचे सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या तपासाला अखेर यश आले. पोलिसांनी मुलीवर अत्याचार करणार्या आरोपी गजानन चव्हाण याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे पिडीत मुलीने आपल्यावर वर्षभरापूर्वी डोंबिवलीत बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत दिली. त्या प्रकरणातील आरोपीचा डोंबिवलीचे पोलिस शोध घेत आहेत.