

Kasara Vaitarna Dam Mining Issue
कसारा : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा जलाशयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर पोकलेनसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या साह्याने डोंगर आणि टेकड्या फोडण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या कथित बेकायदा उत्खननामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन निर्माण होत असून, आधीच गळतीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या जलाशयाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबईची तहान भागविणाऱ्या मध्य वैतरणा धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत धरणाच्या परिसरात अवजड यंत्रसामग्रीच्या साह्याने उत्खनन सुरू असल्याने धरणाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पोकलेनसारख्या यंत्रांच्या सततच्या वापरामुळे जमिनीत कंपने निर्माण होत असून, त्याचा परिणाम धरणाच्या बांधकामावर किंवा मातीच्या भरावावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गळती आणि भूस्खलनाचा धोका
डोंगर आणि टेकड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यामुळे जमिनीच्या नैसर्गिक थरांमध्ये बदल होऊ शकतात. परिणामी धरणाच्या परिसरातील भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याची, तसेच पाण्याचे झिरपणे वाढण्याची शक्यता आहे. उत्खननामुळे जमिनीची स्थिरता कमी झाल्यास धरणालगतच्या टेकड्यांवर भूस्खलन किंवा दरड कोसळण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.
आधीच धरणातून पाण्याची गळती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उत्खनन सुरू राहिल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी उत्खननाच्या ठिकाणाची तातडीने पाहणी करून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिकांना ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून दादागिरी
दरम्यान, या उत्खननाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिक ग्रामस्थांना संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत या कामाविरोधात एल्गार पुकारला आणि सुरू असलेले उत्खनन बंद पाडले.
धरणाच्या सुरक्षेचा गंभीर विषय असतानाही मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच धरण क्षेत्रात काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून ठेकेदार कंपनीला पाठीशी घातले जात असल्याचीही ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उत्खननाची वैधता तपासावी, धरणाच्या सुरक्षिततेचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण करावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गळती होत असताना पोकलेनच्या मदतीने डोंगर टेकड्या उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. यामुळे धरणासह आमच्या सावरकूट गावाला देखील भविष्यात धोकादायक निर्माण होऊ शकतो
- अनंता वारे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सावरकूट