

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाण्याच्या पाईपलाईन व्हॉल्ववर अनेक ठिकाणी गळती सुरू आहे. पाण्याची अशी वारंवार गळती नेहमी का होते ? याचे उत्तर देण्यात एमआयडीसी प्रशासन असमर्थ ठरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात जागरूक रहिवाशांनी सचित्र माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करून खळबळ उडवून दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, तळोजा परिसरातील निवासी आणि औद्योगिक भाग, या जलवाहिनीच्या परिसरात येणार्या खेड्यांना एमआयडीसीकडून दररोज जवळपास 950 ते 1100 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. बारवी गुरुत्व वाहिनीच्या माध्यमातून हा पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिन्यांवर अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असते. तर काही ठिकाणी दोन जलवाहिन्यांमधून पाण्याची सततची गळती होत राहते. ही गळती हळूहळू मोठी होत जाऊन अनेकदा पाण्याचा दाब वाढून गळतीच्या ठिकाणी जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया जाते.
कल्याण-शिळ महामार्गावरील विको नाका/पीएनजी गॅलरीआ शॉपींग कॉम्प्लेक्स जवळ गेल्या दोन दिवसांपासून पाईपलाईन व्हॉल्ववर गळती चालू आहे. शिवाय एमआयडीसीच्या फेज 2 व 3 मध्ये देखील अशाच पद्धतीने व्हॉल्ववर काही ठिकाणी पाण्याची गळती सुरू असल्याचे दिसून येते. या संदर्भात पूर्वी आणि आताही एमआयडीसी प्रशासनाला कळविले असता गळती तात्पुरती दुरूस्त करून घेतली जाते.
पाण्याचा प्रेशर वाढल्यास व्हॉल्वमधून गळती सुरू होते किंवा काही समाजकंटक या पाईपलाईनच्या व्हॉल्ववर छेडछाड करतात असे एमआयडीसीच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. परंतु यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते याबद्दल उपाययोजना प्रशासनाकडून का केल्या जात नाहीत ? असा सवाल डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी उपस्थित केला आहे.