Freedom in modern life : घर दोघांचं

Freedom in modern life
File Photo
Published on
Updated on

ज्योती मुळ्ये

चिंब भिजवणार्‍या मुसळधार पावसात जपून, सांभाळत स्कुटी हाकताना नजर कशी कोण जाणे समोरून जाणार्‍या गाडीवर थांबली. मला सवय आहे, रस्त्यावरून जाताना गाड्यांच्या नंबरप्लेट पाहायची. ही तर होतीच खास... अमूक तमूक 1947... खरं तर नंबरमुळेच लक्ष वेधून घेतलं तिने... बघायला गेलं तर एरव्हीसारखा गाडीचा नंबर, पण 1947 मुळे तो डोळ्यांत भरला. या आकड्याविषयी भारतीयांच्या मनात विशेष आत्मीयता, ममत्व आहे. हा अंक आणि स्वातंत्र्य, सन्मान, अस्मिता यांचा दृढ परस्पर संबंध आहे.तो नंबर दिसला मात्र, अखंड कोसळणार्‍या पावसामुळे चिकचिकलेला माझा दिवस आणि किरकिरा झालेला मूड अचानक सुखावह झाला. स्वातंत्र्यात फिरत असल्याची एक गोड शिरशिरी अंगभर फिरून गेली आणि मग दिवसभर छान छान वाटत राहिलं.

पाहायला गेलं तर स्वातंत्र्याचा अर्थ, त्याची जाणीव प्रत्येकासाठी वेगळी... एखाद्यासाठी सगळ्या गुंत्यातून सोडवलेला पाय म्हणजे स्वातंत्र्य, तर एखाद्यासाठी स्वतःचे निर्णय स्वतः घेता येणं म्हणजे स्वातंत्र्य. आपापल्या वकुबानुसार, गरजेनुसार, परिस्थिती पाहून आपण स्वातंत्र्याची व्याख्या करतो. त्यानुसार वागतो. अलीकडे गंमत काय होते माहितेय? असे काही विचार मनात टपकले रे टपकले की, आमच्यासारख्या रीलभैरवांना तसलीच रीलं दिसायला लागतात. मला अचानक हे रीळ पॉप अप झालं...

काही पुरुष स्वतःला पुढारलेले म्हणवतात. ते म्हणतात, बघ मी तुला सपोर्ट केला, मी तुला जायला दिलं नोकरीला, मी तुला परवानगी दिली... एक मिनिट! हे म्हणणारा कोण आहेस तू???... बरं हे सगळं एका पिढीने स्वीकारलंय... ‘माझा नवरा ना, खूप सपोर्टिव्ह आहे. तो ना, मला नाही म्हणत नाही!’...पण एक मिनिट! तो नाही म्हणणारा कोण आहे? असे प्रश्न उपस्थित करणारं हे रील प्रथमदर्शनी मला आवडून गेलं. भर पावसात अचानक डोक्यात उद्भवलेल्या स्वातंत्र्याचा परिणाम अद्याप होताच रेंगाळत... मग काय, जे दिसलं ते पटलं एकदम! कुणीतरी आपल्या बाजूने बोलतंय, आपल्या निर्णय स्वातंत्र्यासाठी आवाज उठवतंय ही गोष्टच दिलासादायक, सुखावणारी आहे. कुणीही त्याच्या प्रभावाखाली येऊन आपलं मत बनवतं. जसं माझं बनलं. यासारखी रीलं पाहून माझ्यावर अन्याय होतोय ही भावना प्रबळ होतेच कुणाच्याही मनात! माझ्याही झाली. पण घरच्या, कुटुंबाच्या, माझ्या स्वतःच्या निर्णयात मला स्थान आहे, अधिकार आहे किंबहुना कुटुंबातल्या अशा काही निर्णयांसाठी अनेकजणी घेतात तसाच मी देखील पुढाकार घेतलेला आहे. स्त्री म्हणून मला डावललं गेलेलं नाही हे आठवलं आणि रीलने फुगवलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या फुग्याला आपसूक टाचणी लागली. जरा विचार केल्यावर जाणवलं, ती लागणं गरजेचं होतं.

कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रांजळपणाने कबूल करायचं झालं तर अनेक स्थित्यंतरानंतर आजच्या घडीला माझ्याप्रमाणेच बहुतांशी स्त्रियांना त्यांच्या कुटुंबात मान आहे, त्यांच्या निर्णयाला महत्त्व आहे. आज अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातसुद्धा कोणताही निर्णय एकत्र येऊन, चर्चा करून, परिस्थितीला योग्य ठरेल असा घेतला जातो. कारण स्त्रिया शिकलेल्या, कमावत्या आणि बाहेरचं जग पाहिल्यामुळे निर्णयक्षम आहेत. घरात आणि बाहेर दोन्हीकडे स्त्रीचं योगदान मान्य केलेलं आहे. एखाद्या ठिकाणी स्त्रीने आपला पाय मागे घेतला असेल, माघार घेतली असेल (आजकाल पुरुषही घेतात) तर ती त्या कुटुंबाची वैयक्तिक गरज किंवा समजुतीने घेतलेला निर्णय असतो.

जसं स्त्रिया करतात तसंच अनेक ठिकाणी कौटुंबिक गरजेसाठी पुरुषाने थांबायचं आणि कुटुंबातल्या स्त्रीने बाहेर कर्तृत्व गाजवून अख्खं कुटुंब तोलून धरल्याचीसुद्धा उदाहरणं आहेत. ही बदललेली परिस्थिती आहे. आजच्या सामाजिक उतरंडीत स्त्रियांनी स्वकष्टाने आपलं बरोबरीचं स्थान कमावलंय. आजकाल सर्रास ठिकाणी ते स्वीकारलही गेलंय. स्त्रियांनी कणखरपणे मिळवलेल्या या स्थानाला महत्त्व द्यायचं, सन्मान द्यायचा की, आजच्या जगातही स्त्री चळवळीच्या/स्वातंत्र्याच्या नावाखाली चालणार्‍या बुद्धीभेदाला प्राधान्य द्यायचं हे ठरवायला हवं. शेवटी काही निर्णय हे अशा गृहितकांवर आणि जगाच्या ठोकताळ्यांनुसार नाही तर स्वानुभवातून, स्वपरिस्थितीनुसार घ्यायचे असतात.

एखाद्याला वाईट अनुभव आलेही असतील, पण त्याची दुहाई देत ते वैश्विक सत्य असल्यासारखी ओरड मारणही चुकीचंच! अशाने बुद्धिभेद होतो. सुरळीत चाललेलं एखादं कुटुंब पोळलं जातं. आजच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात कोणतंही विधान करताना त्याचे परिणाम काय याचाही विचार व्हायला हवा. लोकांची सुरळीत व घडी बसलेली आयुष्य आपण विस्कळीत करत नाही ना, याचा विचार पोस्ट करणार्‍याने व ते आपणास खरंच लागू होतोय का हे प्रभावित होणार्‍याने बघायला हवं. उचलली जीभ लावली टाळ्याला ही वृत्ती असली तरी शेवटी आपणच राबून काडीकाडीने घडवलेलं आपलं घरटं जपणं ही त्या घरट्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिथे स्त्री-पुरुष ही भाषा येता नये. चंगो म्हणतात तसं, घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं... एकाने पसरवलं तर दुसर्‍याने आवरायचं!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news