

भिवंडी : सुमित घरत
अनेक जिल्हा परिषद मराठी शाळांचे विलीनीकरण डिजिटलायझेशन मध्ये होत असतानाच काही संस्थांसह जिल्हा परिषदेच्या अनेक मराठी शाळांतील पटसंख्येत कमालीची घट झाल्याचे वास्तव काही मराठी शाळांतून उघड होत आहे.त्यामुळे मराठी भाषिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच शासनाने इंग्रजी माध्यमांसाठी 2015 मध्ये लागू केलेल्या धोरणामुळे मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासू लागल्याने पालक वर्गाचा कल इंग्रजी माध्यमांकडे वळू लागल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनांदुरखी - टेंभवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे जुनांदुरखी येथील श्रमिक मंडळ संचलित काशिनाथ नाना टावरे (के.एन.टावरे) जुनांदुरखी (लाखिवली) ह्या पाचवी ते दहावी पर्यंत भरवल्या जाणार्या मराठी माध्यमाच्या शाळेची पटसंख्या गेल्या अनेक वर्षांपासून 700 ते 750 अशी होती. मात्र सद्यस्थितीत आधुनिक काळातील तांत्रिकी करणामुळे इंग्रजी माध्यमांचा कल युवा पालकांमध्ये फोफावत असल्याने अशा पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या यशस्वी भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पाल्यांचे प्रवेश इंग्रजी माध्यमांत करणे पसंत केल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या 200 ते 250 विद्यार्थ्यांनी घटून 500 ते 550 विद्यार्थी संख्येवर येवून पोहचल्याची सत्यस्थिती पहायला मिळत आहे.
दरम्यान सद्यस्थितीत मराठीच्या वादावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून चांगलीच जुंपलेली असताना मराठी माध्यमांतील पालकांचा मराठी शाळांतील कमी होत असलेला स्वारस्य मराठी प्रेमींसाठी भविष्यात चिंतेचा विषय ठरणार यात कुठलेही दुमत नाही. त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची मुले मराठी शाळेत शिकत असल्याने त्यांचा ठीकठिकाणी सत्कार होत आहे.
भाषेची गोडी जिवंत ठेवणार का?
नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शासनाने जसे इंग्रजी माध्यमांना प्राधान्य देणारे धोरण अंमलात आणले आहे, त्याप्रमाणेच मराठी शाळा वाचवण्याकरिता आणि मराठी भाषेच्या जनजागृती करिता शासन किंवा राजकीय पक्षांतील मराठी नेते मंडळी मातृभाषेचा अभिजातपणा टिकवण्यासाठी काही विशेष उपाययोजना आखून मराठी भाषेची गोडी जिवंत ठेवणार का ? याबाबत मराठी प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
इंग्रजीची मुले पुन्हा वळतायेत मराठी माध्यमाकडे
पूर्वीपेक्षा विद्यार्थी पटसंख्येत काही प्रमाणात नक्कीच घट झाली आहे. यापूर्वी जि.प च्या लाखिवली-जुनांदुरखी मराठी शाळेत शिक्षण घेणार्या पालक वर्गाची मुलेच इंग्रजी माध्यमांत शिक्षण घेत आहेत. दुसरीकडे भिवंडीच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांची मुलगी मराठी शाळेत शिक्षण घेत असल्याने ही बाब मराठी शाळांसाठी महत्त्वाची आहे.तर काहीवेळा 1 ली ते 4 थी पर्यंत इंग्रजी माध्यमांत शिक्षण घेणारी मुले 5 वीपासून पुन्हा जि.प मराठी शाळेत वळत असल्याचेही अनेकदा दिसून येत असल्याचे नांदुरखी शाळेचे लिपिक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
मराठी भाषेचा अभिजातपणा जिवंत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीसह वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना आखून मराठी भाषेची जनजागृती करणे आवश्यक आहे.
संजय अस्वले, गटशिक्षण अधिकारी, भिवंडी पंचायत समिती
मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची होणारी पट संख्या कमी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे शासनाचे इंग्रजी शाळांना प्राधान्य देणारे धोरण.2015 नंतर लागू झालेल्या नियमांमुळे शिक्षकांची कमतरता वाढली, आणि पालक इंग्रजी माध्यमाकडे वळले. परिणामी, मराठी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची ओढच कमी झाली आहे.
परेश चौधरी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, ठाणे जिल्हाध्यक्ष