

डोंबिवली : दुकानावरील पाट्या मराठी भाषेत लावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आस्थापनांना दिला होता. मात्र मराठमोळ्या डोंबिवलीत मराठीची पायमल्ली केल्याचा प्रकार पूर्वेकडील सावरकर रोड परिसरात आढळून आला आहे. या दुकानदाराने त्याच्या दुकानावर चक्क गुजराती भाषेतील पाटी लावण्यात आली आहे.
डोंबिवलीतील सावरकर रोडला असलेल्या एका दुकानदाराने नियमांची पायमल्ली करत गुजराती भाषेतील पाटी लावली आहे. ही पाटी पाहून मराठी भाषिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नियमांची जाहीररित्या पायमल्ली करणाऱ्या अशा मराठीद्वेष्ट्या दुकानदारावर शासनाच्या दुकाने व संस्था आस्थापना विभागासह केडीएमसी प्रशासन आणि आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड काय कारवाई करणार ? याकडे डोंबिवलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
संबंधित दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठी देवनागरी लिपीबरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. तथापी मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे शासनाच्या राजपत्रात नमूद केले आहे. तसेच ज्या आस्थापनात कोणत्याही प्रकारे मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनास महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देण्यात येऊ नये. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.