

भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी, हिंदी वाद उफाळून येत आहे. हा वाद शमविण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषिकांसाठी मराठीची अ, ब., क, ड ची उजळणी देण्याचा स्नेह उपक्रम सुरु केला आहे.
शहरातील अमराठी नागरीकांनी सहजतेने मराठी शिकावी, यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत बाराखडीची पुस्तके ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शाखांमध्ये मराठी शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून कोणावरही जबरदस्ती न करता प्रेमाने मराठी शिकविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार वेळा आपण मिरा-भाईंदरमधून मराठी आमदार म्हणून निवडून आलो असून येथे राहणार्या प्रत्येक भाषेच्या नागरीकांनी आपल्याला मत दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येणं आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी ती जबरदस्तीने नव्हे तर प्रेमाने शिकविण्याचा सल्ला त्यांनी मनसेचे नाव न घेता दिला.
मिरा-भाईंदर मध्ये शिवसेनेचे 22 नगरसेवक असून त्यातील बहुतांशी नगरसेवक अमराठी आहेत. मिरा-भाईंदर शहर आगरी, कोळ्यांचे शहर असून ते एक शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या शहरात आगरी, कोळी संस्कृती जपली जात असतानाच या शहरात देशाच्या कानाकोपर्यातून येणारे हिंदी भाषिक देखील आगरी, कोळी संस्कृती जपत मंगळागौर, गणेशोत्सवासारखे सण साजरे करतात. त्यामुळे या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहन त्यांनी अप्रत्यक्षपणे समाजात फूट पडणार्यांना केले.
शिवसेनेत मराठी, हिंदी पदाधिकारी व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करीत असून काही राजकीय नेते मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी भाजप आ. नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता केला. भाषावाद पेटवून स्वार्थ साधण्यापेक्षा सर्व नागरीकांना सोबत घेऊन शहराचा विकास करणे हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून मराठी भाषा शिकविण्याचा स्नेह उपक्रम सुरू करण्यात आला असून मराठी भाषा शिकण्यासाठी शहरातील अमराठी नागरीकांनी शिवसेनेच्या शाखांमध्ये येऊन प्रेमाने मराठी शिकावी, असे आवाहन त्यांनी परप्रांतीयांना केले.