

भाईंदर : मिरा-भाईंदर व बोरिवली, मालाडच्या हद्दीवर असलेल्या गोराई, मनोरी बीचवर पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांसह स्थानिक प्रवाशांची येथील मुजोर रिक्षाचालकांकडून लूट होत आहे. याकडे प्रादेशिक परिवहन विभागासह स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक प्रवाशांकडून होऊ लागला आहे.
बोरिवलीच्या चारकोप येथून गोराई खाडी मार्गे गोराई गावातील परिसरात एस्सेलवर्ल्ड, वॉटरकिंग्डम, पॅगोडा (विपश्यना केंद्र), समुद्र किनारा तर मनोरी येथे गगनगिरी महाराज मठ, बीचसह अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट आहेत. याखेरीज येथील हिरवळ पर्यटनाचे नैसर्गिक आकर्षण असल्याने या दोन्ही ठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.
हे पर्यटक येथील शेतकर्यांकडून ताजी भाजी, फळभाजी तर मच्छिमारांकडून ताजी मासळी खरेदी करून स्थानिक घोडागाडीची सैर करीत पर्यटनासह निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. सुट्टीच्या दिवशी तर येथील समुद्रकिनारे, हॉटेल्स व रिसॉर्ट्स पर्यटकांनी बहरलेले असतात. यातील अनेक पर्यटक आपल्या खाजगी वाहनांमधून येत असतात तर काही सार्वजनिक वाहतूक उपक्रमांच्या बससह रिक्षांमधून येत असतात. मात्र यातील स्थानिक रिक्षाचालकांचा येथे येणार्या पर्यटकांसह स्थानिक प्रवाशांना वेगळाच अनुभव पहायला मिळू लागला आहे.
पर्यटक व स्थानिक प्रवाशांकडून येथील रिक्षावाले मनमानी भाडे आकारत असल्याने ते त्या प्रवाशांची लूट करू लागल्याचा आरोप होऊ लागला आहे. यावर अंकुश ठेवणार्या वाहतूक कर्मचार्यांचा येथे नेहमीच अभाव असल्याचा गैरफायदा येथील रिक्षाचालक घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच या दोन्ही ठिकाणी मिरा-भाईंदर महापालिका परिवहनच्या बसच्या सेवेची वारंवारीता एक तासाची असल्याने अनेकदा या बसची वाट न पाहता पर्यटक व स्थानिक प्रवाशी रिक्षाचा आधार घेतात. तर मुंबई महापालिकेच्या बेस्ट परिवहन सेवेची एकच मिनी बस गोराई खाडी ते गोराई नाका दरम्यान सेवा देत असल्याने हि सेवा देखील फेरीबोटच्या वारंवारीतेवर अवलंबून असते. त्यामुळे याठिकाणी आपल्या खाजगी वाहनांखेरीज येणारे बहुतांशी पर्यटक रिक्षाद्वारे या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी येत असल्याचा गैरफायदा घेत येथील रिक्षाचालक घेऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. ते पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
येथील रिक्षांना मीटर लावण्यात आले असले तरी ते केवळ शोभेपुरती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रती प्रवाशामागे वा सरसकट भाडे आकारले जात असतानाच सायंकाळ व रात्रीच्या वेळी तर रिक्षांचे दर कितीतरी पटीने वाढविले जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. यामुळे येथील एखाद्या गरीब प्रवाशाला येथून रिक्षाने प्रवास करायचा झाल्यास प्रथम त्याला रिक्षाचे अव्वाच्या सव्वा भाडे अदा करण्यासाठी आपली ऐपत बघावी लागते, अशी परिस्थिती येथे निर्माण झाल्याचे पहायला मिळू लागली आहे. अशातच एकटा दुकटा प्रवाशी अडचणीत असेल तर त्याला मदत करणे तर सोडाच पण एखाद्या रिक्षाचालकाने भाडे सुद्धा कमी करता कामा नये, याची पूर्ण व्यवस्था येथे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केवळ एक, दोन किलोमीटर अंतर असेल तर किमान प्रती प्रवाशामागे 50 ते 100 रुपये भाडे आकारले जाते. भाईंदर रेल्वे स्थानक येथे जायचे झाल्यास तब्बल 500 ते 600 रुपये भाडे वसूल केले जात असून मीटरप्रमाणे भाडे घेण्याबाबत सांगितल्यास स्पष्ट नकार दिला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यातच एखादे जोडपे दिसल्यास स्थानिक प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जाते. बाहेरून येणार्या रिक्षाचालकांना येथील प्रवाशांची वाहतूक करण्यास मज्जाव केला जातो. रिक्षाचालकांच्या या लुटीवर वाहतूक तसेच स्थानिक पोलिसांचा अंकुश नसल्यानेच येथील रिक्षाचालक मुजोर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.