

ठाणे : वृत्तपत्रातील विवाह जाहिराती, मॅट्रिमोनियल साईटस्, खोटी नावे, बनावट ओळखी आणि लग्नाचे आमिष... या सगळ्यांच्या जोरावर देशभरातील महिलांना गंडवणारा एक आधुनिक ‘लखोबा लोखंडे’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे हा भामटा एकाच नावाने नव्हे, तर अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग, जयप्रकाश गुप्ता अशा अनेक नावांनी महिलांशी विवाह करून त्यांची कोट्यवधीची फसवणूक करत होता.
मी श्रीमंत आहे... तुझ्याशी लग्न करणार... आयुष्यभर सुखात ठेवणार... अशा गोड बोलांनी महिलांचा विश्वास संपादन करायचा, विवाह करायचा आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याची व संपत्तीची अक्षरशः राखरांगोळी करायची, असे त्याचे फसवणुकीचे बहुरूपी साम्राज्य होते. ठाण्यातील मीरा रोड येथील एका ७५ वर्षीय महिलेने आपल्या ४५ वर्षीय मुलीच्या विवाहासाठी आरोपीशी संपर्क साधला. आरोपीने स्वतःला श्रीमंत व्यावसायिक म्हणून सादर करत पीडित महिलेशी लग्न केले. त्यानंतर लखनौमध्ये फ्लॅट आणि दुमजली घर बांधण्याचे स्वप्न दाखवत तिच्याकडून मीरा रोडमधील फ्लॅट विकायला लावला. टप्प्याटप्प्याने ८२ लाख रुपये उकळल्यानंतरही दिल्लीला नेऊन ३३ तोळे सोने व हिऱ्यांचे दागिने काढून घेतले आणि तिला रेल्वेत बसवून स्वतः फरार झाला. एकूण ९७ लाख रुपयांचा गंडा घातला. तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. याच आरोपीने अमरावतीतील एका महिलेशी अजय संतोष सिंग या नावाने लग्न करून २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे ग्रेटर नोएडा येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून २० लाखांची आलिशान कार, बनावट आधार कार्ड, मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले.
मुलगाही बापाच्या कृत्यात सहभागी
तपासात आरोपीचे खरे नाव अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर त्याचा मुलगा अविरल ऊर्फ प्रखर त्रिवेदी हाही या फसवणूक रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे.
फसवणुकीचे बहुरूपी साम्राज्य उघड
देशभरातील दिव्यांग, घटस्फोटित, मतिमंद आणि असहाय अशा २५ हून अधिक महिलांना या भामट्याने प्रेम, विवाह आणि सुखी संसाराचे स्वप्न दाखवून लुटल्याचे तपासात समोर आले आहे.