Malshej Ghat monsoon tourism : माळशेजला बहरले वर्षा पर्यटन

हजारो पर्यटकांच्या गर्दीने वीकेंडला होते वाहतूककोंडी
Malshej Ghat monsoon tourism
माळशेजला बहरले वर्षा पर्यटनpudhari photo
Published on
Updated on
टोकावडे : मुकेश शिंदे

ठाणे जिल्ह्यातील सर्वात रहदारीचे आणि प्रसिद्ध असलेले माळशेज वर्षा पर्यटन स्थळ जूनपासूनच गजबजून गेले आहे. या वर्षा पर्यटन स्थळावर वीकेंडला होणार्‍या वाढत्या गर्दीमुळे वाहतूककोंडीचे संकटही उभे राहत आहे.

माळशेज घाटात मनमोहक हिरवळ पसरली आहे. सध्या पाऊस पडत आहे. त्यामुळे येथे हिरवागार सुंदर निसर्ग, दुर्मिळ फुलझाडे, परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान, उंचीवरून पडणारे धबधबे, यामुळे माळशेज घाटाला एक वेगळेच सौंदर्य निर्माण झाले आहे. मात्र, माळशेजच्या पर्यटनावर आता दरडी कोसळण्याचेही संकट आहे. त्यामुळे येथून जाणार्‍या प्रवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे-कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात मनमोहक पसरलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करणारी ठरत आहे. सध्या पावसामुळे येथे हिरवागार सुंदर निसर्ग, फुलझाडे, परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान, पाण्याचे उंचावरून पडणारे धबधबे, यामुळे माळशेज घाटाचे अनोखे सौैंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारे ठरले आहे.

मुंबईकडून माळशेजकडे येताना दिसणारा नाणेघाट, त्याच्या बाजूचे भोरांड्याचे दार, मोरोशी जवळचा डोंगराच्या पोटातील अजस्र कातळ भिंतीचा भैरवगड, माळशेज घाट चढून येताना जराशी धोकादायक पण साहसी वाटणारी धबधब्यांची माळ, बोगदा, घाटात विकसित झालेली निसर्ग पर्यटनाची स्थळे, घाटमाथ्यावरील एमटीडीसीचे पर्यटकांसाठीचे निवासस्थान, पुढे पिंपळगाव जोगा धरणाची पश्चिमेकडील भिंत आणि त्यावरून उत्तरेकडे जाताना डावीकडे काळू नदीच्या पलीकडे असणारे मध्ययुगीन खिरेश्वराचे मंदिर, शिंदोळा किल्ला, गणेश खिंड अशी लांबत जाणारी पर्यटनस्थळांची शृंखला पर्यटनाचा आवाका सांगून जाते. माळशेज घाट हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण ओळखले जाते.

सह्याद्रीच्या अतिविराट, अतिराकट, अजस्र शिळांच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे फेसाळणारे धबधबे सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे खास वैशिष्ट्य आहे. याच पर्वतरांगामधील पर्यटकांना खुणावणारा माळशेज घाट म्हणजे सह्याद्रीच्या शिरपेचातला मानाचा तुराच आहे.

दरवर्षी सहलीचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले आपसूकच याच माळशेजकडे वळतात. महाराष्ट्रातील पर्यटनाचे ‘हॉट डेस्टीनेशन’ असणारा हा घाट दरडी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटकांसाठी धोक्याचा बनला आहे. दरवर्षी घाटात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतात. त्यामुळे येथील पर्यटनावर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. घाटातील दरडी कोसळण्याची भीती पाहता पावसाळ्यातील पर्यटकांच्या सहलीच्या आनंदावर दरडींचे सावट कायम आहे.

घाटात कोट्यवधीचा खर्च; मात्र सुरक्षेचे काय?

पर्यटन विकासाच्या नावाखाली माळशेज घाटात कोट्यवधी रुपये दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात येतात. तरीही येथील दरडी कोसळण्याचे सत्र दरवर्षी पावसाळ्यात सुरूच असते. येथे सुसज्ज पार्किंग व्यवस्था, संरक्षक कठडे, स्वच्छ रस्ते, यासाठी आजमितीला करोडो रुपये खर्च करण्यात आले. पण येथील घाटमाथ्यावरील अपघात रोखता आलेले नाहीत.

निकृष्ट कामांमुळे तर काही ठिकाणी संरक्षण कठडेदेखील कोसळून पडल्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत. यामुळे हा माळशेज घाट प्रवासासाठी अत्यंत धोकादायक झालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोसळणार्‍या दरडींच्या सावटाखाली अगदी जीव धोक्यात घालून येथून प्रवासी व वाहनचालकांना माळशेज घाट पार करावा लागतो.

माळशेज घाटात चीनच्या धर्तीवर तरंगता काचेचा पूल?

माळशेज घाटात चीनच्या धर्तीवर तरंगता काचेचा पूलही बांधण्याचा प्रस्ताव आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला आहे. अनेकदा यासाठी निधीचीही घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात यावर कार्यवाही झालेली नाही. घाटमाथ्यावर शासनाचे जिथे रेस्ट हाऊस आहे. त्याला लागूनच हा पूल प्रस्तावित आहे.

चीनचा पूल हा 18 मीटर आहे. माळशेज घाटातील पूल हा 25 मीटर असणार आहे. त्यामुळे माळशेज घाटावरील पूल हा जगातील सर्वात मोठा पूल ठरणार आहे. येथून खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यावेळी सांगण्यात आले होते. आता या पुलाची कधी उभारणी होणार? याकडे लाखो पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news