

सापाड : कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लागली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते. त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.
गोडाऊनमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनांच्या ड्रममुळे आग पाहता पाहता पसरली. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या ताफ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पाण्याच्या बंबांसोबतच केमिकल आग विझवण्यासाठी विशेष फोमचा वापर करण्यात आला. आगीमुळे शेजारील इमारतींनाही धोका निर्माण झाला होता, मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने त्यांना धोका टळला.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गोडाऊन चालवणार्या संबंधितांवर चौकशी सुरू केल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.
या आगीत गोडाऊनमधील साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा केमिकल रिऍक्शनमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विनायक लोखंडे, अग्निशामक दलाचे अधिकारी