ठाणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शासनाकडून राबवण्यात आलेल्या ‘महावाचन उत्सव 2024’ या उपक्रमाचे बनावट प्रमाणपत्र बाहेर आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
प्रमाणपत्रासाठी शासनाकडून ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून याच ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांची माहिती भरल्यास प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रमाणपत्राचा मायना देखील स्वतः शिक्षणमंत्र्यांनी मंजूर केला असताना अशाप्रकारे चुकीचा मायना असलेले बोगस प्रमाणपत्र बाहेर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यासंदर्भात कल्याणच्या सायबर सेलमध्ये जि.प.च्या सायबर सेलमध्ये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने 16 जुलै रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024’ हा उपक्रम राबविण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या.
16 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा महापालिकांना महावाचन उत्सव 2024 राबविण्यासाठी https://mahavachanutsav.org ही वेब अॅप्लिकेशन ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली. सदरची प्रणाली सर्व जिल्हा व महानगरपालिका स्तरावर पाठविण्यात आली. या वेब अॅप्लिकेशनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची माहिती समाविष्ट केल्यावर शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाते. नंतर सदर विद्यार्थ्यांची माहिती शाळेच्या डॅशबोर्डमध्ये दिसून येते. माहिती योग्य असल्यास डॅशबोर्डमध्ये जनरेट सर्टिफिकेट बटनावर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांच्या माहितीवरून प्रशस्तीपत्र तयार होऊन ते विद्यार्थ्यांस प्राप्त होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र शाळेमार्फत ऑनलाईन देण्याची सुविधा संगणक प्रणालीवर आहे. प्रमाणपत्रात मायना अचूक असून प्रशस्तीपत्राचा मसुदा शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा यांनी मान्य केला आहे. मात्र ऑनलाईन प्रणालीतून अचूक प्रमाणपत्र उपलब्ध होत असताना असे बनावट प्रमाणपत्र बाहेर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकार्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यामध्ये एका खासगी शाळेच्या चौकशीचे आदेश दिले असताना शिक्षण अधिकार्यांनी मात्र यासंदर्भात कल्याणच्या सायबर सेलमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर यासंदर्भात शिक्षण अधिकार्यांनी शाळेचे नाव घेण्यासही टाळाटाळ केली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे पत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिवांना दिले आहे.
सदरचे प्रशस्तिपत्रक हे बनावट आहे ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शाळेबाबत तूर्तास प्रतिक्रिया देता येणार नाही.
ललिता दहीतुल्ले, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे