

भिवंडी: महाराष्ट्रातील लाखो शिक्षक उमेदवारांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून ठाणे पोलिसांनी भिवंडी न्यायालयात तब्बल ३५०० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
२८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर असताना, २६ जून रोजी भिवंडीतील कोनगाव परिसरात प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणलेल्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती.
त्यांच्या ताब्यात टीईटीच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच आढळल्यानंतर हा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आणि नियोजित परीक्षा स्थगित करण्याची वेळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर आली.
२८ जून रोजी राज्यभरात टीईटी परीक्षा होणार होती. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झालेली असतानाच २६ जून रोजी ठाणे पोलिसांना भिवंडीतील एका व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती मिळाली.
काही जण टीईटीचा प्रश्नपत्रिका संच घेऊन तो विक्री करण्यासाठी कोनगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत बिहारमधील राजीव शाह आणि आकाश कुमार तसेच हरियाणातील धीरज सिंह यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या ताब्यातून टीईटीच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त करण्यात आले. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रश्नपत्रिकांची पडताळणी करण्यात आली असता त्या २८ जूनच्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईनंतर राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा स्थगित केली. या घटनेमुळे राज्यातील सुमारे सहा लाख उमेदवारांवर परिणाम झाला. पेपरफुटीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
शासनाने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील अॅड. मिसार यांची नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खटला जलदगतीने चालविण्याचे प्रयत्न असून, किमान तीन महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, दोषारोपपत्रात पोलिसांनी आरोपींमधील संपर्क, आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिकेची हालचाल, मुद्रणालयातून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याची कथित पद्धत तसेच बिहारमध्ये मिळालेली मूळ प्रश्नपत्रिका यासह विविध पुराव्यांचा आधार घेतला आहे.
त्यामुळे टीईटी पेपरफुटीचा हा तपास केवळ भिवंडीतील प्रश्नपत्रिका विक्रीपुरता मर्यादित न राहता आग्रा, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंतरराज्य साखळीपर्यंत पोहोचचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
आरोपींत सोलापूर येथील प्रकाश पवारचा समावेश
या प्रकरणात महाराष्ट्रातून अटक झालेल्या आरोपींमध्ये सोलापूर येथील प्रकाश पवार याचा समावेश आहे. तो शिकवणी वर्गाशी संबंधित असल्याचे तपासातून पुढे आले. ११ ऑगस्ट रोजी त्याला अटक झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत गेली. पोलिसांच्या तपासानुसार, प्रश्नपत्रिकेची पुढील साखळी आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत तिची पोहोच याबाबत त्याची भूमिका तपासण्यात आली.
आरोपपत्रात१८ जणांचा समावेश
आतापर्यंत या प्रकरणात समोर आलेल्या आरोपींमध्ये बिजेंद्र कुमार गुप्ता, इंद्रजीत सिंह, राजीव शॉ, आकाश कुमार, धीरज सिंह, सोनू सिंह, मिथुन सिंह, कपिल दहिया, सुमनकुमारी गुप्ता, नरेशकुमार महोर, संजयकुमार शर्मा, बाबूलाल कुशवाह, सोनूकुमार दिवाकर आणि प्रकाश पवार यांचा समावेश आहे. १८ आरोपींपैकी दोन जण फरार असल्याचे दोषारोपपत्राबाबतच्या अहवालात नमूद आहे.
भिवंडीत अटक करण्यात आलेल्या आरोपींचा प्रश्नपत्रिका विक्रीसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा सौदा करण्याचा प्रयत्न असल्याचे तपासात समोर आले होते. यामुळे या प्रकरणामागे मोठे आंतरराज्य जाळे असल्याचा संशय बळावला.