खानिवडे : महाराष्ट्र राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. यातून रिक्षाचालकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी वसई प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे.
वसई-विरार शहरात परवाने खुले झाल्यापासून आटोरिक्षांची संख्या खूप वाढली आहे. सद्यस्थितीत शहरात हजारोंच्या संख्येने रिक्षा चालक आहेत. दिवसरात्र रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. या रिक्षा चालकांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात मिळावा यासाठी शासनाने १६ मार्च २०२४ रोजी राज्यातील ऑटो रिक्षा चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या मंडळांतर्गत जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य योजना आदी योजना राबविल्या जाणार आहेत. ऑटो, रिक्षा चालकांसाठी सामाजिक सुरक्षा, परवानाधारकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबवणे. अशा विविध योजनांचा लाभ रिक्षा चालकांना मिळणार आहे. या योजनांचा अंमलबजावणी करण्याचे काम वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागा कडून करण्यात आले आहे.
यासाठी पालघर जिल्ह्यातील रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांची अर्ज भरून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी सहभागी होऊन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. चालकांनी लाभासाठी जिल्हा कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, सदर अर्ज जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव पात्र लाभधारकांच्या यादीस जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन लाभाचे वितरण केले जाईल असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांनी सांगितले आहे.
• जीवनविमा व अपंगत्व विमा योजना • कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (५० हजार रुपयांपर्यंत) • आरोग्य विषयक लाभ. • पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. • कामगार कौशल्य वृद्धी योजना • ६५ वर्षावरील ऑटोरिक्षा/मीटर टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान. • नवीन ऑटोरिक्षा / मोटर टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज. • राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना. • शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजना.