

ठाणे/नाशिक : सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक, सहायक आयुक्त, पोलिस उपायुक्त, पोलिस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकार्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागणार्या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसला, तरी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे.
या हनी ट्रॅप प्रक रणात अनेक अधिकारी अडकल्याने या प्रकरणाला हाय प्रोफाईल स्वरूप आले आहे. हनी ट्रॅपची तक्रार देऊन खळबळ उडवून देणार्या महिलेविरोधातदेखील अनेक तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर बदनामी करण्याची व पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी देत या महिलेने खंडणी मागितल्याचे आरोप करीत पुणे, मुंब्रा, कळवा, ठाणे खंडणीविरोधी पथक आदी ठिकाणी महिलेविरोधात तक्रारी दाखल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईसह पुणे भागातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांविरोधात अत्याचाराच्या तक्रारी देऊन या महिलेने खंडणी उकळल्याचा आरोप आहे. 40 ते 50 लाखांची खंडणी मागून 50 ते 60 हजार या महिलेने उकळल्याचे विविध पोलिस अधिकार्यांच्या तक्रारीत नमूद आहे. अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्याकडे 25 ते 50 लाखांची खंडणी मागितल्याचे म्हटले आहे. या महिलेने पहिल्या तक्रारी देऊन त्यानंतर प्रतिज्ञापत्र देऊन गैरसमजुतीतून तक्रारी दिल्याचा जबाब नोंदवला. तर, काही ठिकाणी तडजोडीअंती तक्रारी मागे घेतल्या आहेत.
या महिलेनेही पोलिस अधिकार्यांविरोधात नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. तर, काही अधिकार्यांनी फेसबुक, व्हॉटस्अॅपवर संपर्क साधून त्रास दिल्याचे महिलेने म्हटले होते.
एका तक्रारीत पोलिस उपनिरीक्षक यांनी नोकरीचे आमिष दाखवून पुणे येथे बोलावून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. तर, दुसर्या एका तक्रारीत लग्नाचे आमिष दाखवून बेलापूर येथे बोलावून लॉजवर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. भिवंडी येथे बोलावून अमानुष अत्याचार झाल्याचे या महिलेने एका तक्रारीत म्हटले होते. कळवा येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे म्हटले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात अनेक तक्रारींत तथ्य नसल्याचा निष्कर्ष नोेंदवला. या महिलेवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
नाशिक येथे राहणार्या एका महिलेसह ठाण्यात राहणार्या एका व्यक्तीने दीड महिन्यापूर्वी ठाणे पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. त्या दाखल तक्रारीत राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, आजी-माजी मंत्री, राजकीय नेते व पोलिस अधिकारी हनी ट्रॅपसारख्या प्रकारात अडकल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे, महिलेने दिलेल्या तक्रारीत सर्व सनदी अधिकार्यांची नावे व पद नमूद करण्यात आले होते. त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकाराचा तपास करण्यात येत होता. मात्र, गुन्हे शाखेने या घटनेची चौकशी सुरू केल्यानंतर अचानक तक्रारदार महिलेने आपण ही तक्रार गैरसमजुतीतून केली असून, ही तक्रार परत घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र ठाणे पोलिसांकडे सादर केले होते. या महिलेने दिलेल्या तक्रारीत अनेक अधिकार्यांवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.
नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आता समोर येत आहे. अधिकारी, तसेच आजी-माजी मंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना ट्रॅपमध्ये अडकवल्याचे समजते. अधिकारी, तसेच आजी-माजी मंत्र्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याने, हा ट्रॅप की अधिकार्यांच्या रासलीला, याचीही सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि बडे नेते दिसत असल्याने, याबाबत कोणीही वाच्यता करण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
राज्यातील अधिकारी व नेते इतक्या मोठ्या संख्येने हनी ट्रॅपसारख्या प्रकारात अडकल्याची बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली. हा हनी ट्रॅप पाकिस्तान अथवा इतर देशविघातक शक्तींकडून तर रचण्यात आला नाही ना, याची सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र, हा हनी ट्रॅपचा प्रकार एका राज्यातील एका महिलेकडून रचण्यात आला असल्याचे पोलिस तपास चौकशीतून समोर आले आहे. या घटनेत पाकिस्तान अथवा इतर देशविघातक शक्तींचा कुठलाही सहभाग आढळून आलेला नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आजी-माजी मंत्री हे उत्तर महाराष्ट्रातीलच असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीत या मंत्र्यांचा नामोल्लेख असल्याचे समजते. मात्र, पोलिस याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नसून, त्यांच्याकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. दरम्यान, हे मंत्री नेमके कोण? याबाबत एकच चर्चा रंगत आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या 72 वरिष्ठ अधिकार्यांमधील बहुतांश अधिकारी सद्यस्थितीत नाशिक-पुणे-मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे. या अधिकारी, तसेच आजी-माजी मंत्र्यांचे व्हिडीओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर, या ट्रॅपचा ‘मास्टरमाईंड’ हा नाशिकचाच असल्याचे समोर येत असून, तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतची वाच्यता केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.
नाशिक दौर्यावर असलेल्या या बड्या राजकारण्याने हनी ट्रॅपची ‘राज’ की बात सांगत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक अधिकारी, ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्या आहेत. तर, नाशिकमध्ये दाखल तक्रार अधिकार्याच्या पत्नीचीच असल्याचे कळते.