Ganesh Chaturthi : जय देव जय देव जय मंगलमूर्ती

अष्टविनायकांची आठही स्थानं महाराष्ट्रातच
Ganesh Chaturthi
जय देव जय देव जय मंगलमूर्ती pudhari photo
Published on
Updated on

डॉ. महेश केळुसकर

महाराष्ट्रातील लोक गणपती पूजक आहेत, जसे बंगालमध्ये लोक कालीपूजक आहेत किंवा उत्तर प्रदेशातील मंडळी कृष्णभक्त आहेत. अष्टविनायकांची आठही स्थानं महाराष्ट्रातच आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी नदीकाठची किंवा तळ्याकाठची माती आणून हाताने जमेल तशी गणेशमूर्ती तयार करायची आणि ओल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची... हळद-कुंकू अबीर, फुले आणि पत्री वाहून तिची समंत्रक पूजा करायची आणि दुसर्‍या दिवशी तिचं विसर्जन करायचं हीच प्रथा घरोघरी पूर्वी चालू होती. ज्यांना स्वतःच्या हाताने ओबडधोबड सुद्धा मूर्ती बनवता येत नसे ते चांगल्या मूर्तिकारांकडून मूर्ती तयार करून घेत असावेत. अशाच बर्‍यापैकी मूर्ती करणार्‍यांपैकी त्यावेळचे एक गृहस्थ भिकाजीपंत देवधर यांचं नाव नजरेसमोर येतं.

तळकोकणात जन्मलेले भिकाजी पंत उपजीविकेचे साधन मिळवण्याकरता म्हणून 1860 च्या सुमाराला पेणला आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या हयातीतच पेण गावात लोंढे, राहाळकर यांचे कारखाने सुरू झाले. भिकाजीपंतांचे पुत्र गणेश भिकाजी ऊर्फ बाबुराव देवधर यांनी वडिलांच्या पश्चात व्यवसाय चालू ठेवला. अलीकडच्या काळात ज्यांनी पेणच्या गणपतीमूर्तींच्या व्यवसायाला नावारूपास आणले त्यामध्ये सर्वश्री बळीराम पवार, प्रदीप हजारे, जयवंत गुरव, राजाभाऊ गुरव, बिवलकर, सुरावकर, माधव फाटक, साळवी, कुंभार आळीतील जोशी, भोईर वगैरे नावे प्रामुख्याने आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी लहान गावात सुद्धा गणपतीच्या शाळा (कारखाने )चालतात. रत्नागिरी, सुकळवाड-मालवण, वेंगुर्ले आदी गावे गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत.

ठाण्यामध्ये एक संपूर्ण घरच गणपतीचं आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. ईडन वुड्स इथे ज्यांचं घर गणेशांनी भरलेलं आहे त्या माणसाचं नाव आहे के. एस. हरिहरन. यांच्या चार खोल्यांच्या घरात अगणित गणपतींचा संग्रह आहे. विविध आकाराच्या देखण्या मूर्ती तर आहेतच शिवाय प्रतिमा, तस्विरी, दिवे, गालिचे , निरांजने, रत्ने , मणी, घंटी, शंख, चित्रे , रुद्राक्ष, हिरे , पोवळे, पाचू , पुस्तके, फुलदाण्या, की चेन्स, पेन, पेले, कप, दारावरची बेल, उदबत्तीचे घर अशा कितीतरी वस्तूंवर गणेश विराजमान झालेले आहेत. बाहेरचा हॉल, माजघर, बेडरूम, किचन या चारही खोल्यांमध्ये गणेशरूपातील विविध कलाविष्कारांंचं दर्शन घडतं. दारावरच्या बेलवरही गणेशाचे प्रतीक आहे व तिथे जवळच सर्वांच्या दर्शनासाठी त्यांनी गणपतीची मूर्ती ठेवली आहे.

सातारा जिल्ह्यात टोपसंभापूर या गावाच्या बाहेर 114 फूट उंचीची सिमेंट काँक्रीटची गणेश प्रतिमा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. कर्नाटकाच्या ‘चिन्मय मिशन’ने ही भव्य प्रतिमा उभारली असून ती चतुर्भुज आहे. सुखासनातील ही प्रतिमा कॅमेर्‍यात पकडण्यासाठी 500 फूट मागे जावे लागते. ती भव्य प्रमाणबद्ध प्रतिमा पाहून अक्षरशः मन भरून येतं. गणपतीच्या बैठकीखाली 400 वर्ग फुटाचा तपश्चर्यचिंतन कक्ष आहे. प्रतिमेच्या मस्तकावर नागाचा फणा असून दाक्षिणात्य पद्धतीची ही प्रतिमा शोभेची आहे. तिच्या पावलावर चार व्यक्ती चौरस खेळू शकतील. प्रतिमा नितांत सुंदर असून त्या निर्गुण निराकारास शिल्पज्ञाने शोधून साकार केलाय.जपानमध्ये गणपतीची सु.559 देवळं आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो.

कन्जिटेन म्हणजे भाग्य देवता! सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य आशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची मूर्ती फार पूर्वीपासून पूजिली जात आहे. गणपतीचे वेगवेगळे पुतळे अफगाणिस्तान, इराण, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, बल्गेरिया, मेक्सिको आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांमधून आढळतात. यावरून हे स्पष्ट होतं की प्राचीन काळात गणेश संप्रदाय जगभरातल्या अनेक देशातून पसरला होता. ग्रीक देशातल्या चलनी नाणी-नोटांवर गणेशाचं चित्र आहे.

इंडोनेशियाच्या नोटांवरही तसंच चित्र आहे. गणपतीचं वेदकालीन मूळही शोधलं गेलं आहे. ते दहा हजार वर्षांपूर्वी इतकं प्राचीन आहे. यजुर्वेदातली 16/25 ऋचा नमो गणेभ्यो गणपती किंवा मार्गातले अडथळे दूर होवोत, अशा अर्थाच्या प्रार्थना वैदिक वाङ्मयात आढळतात. नवी दिल्लीतील आयर्लंडच्या वकिलाची इमारत ही पहिलीच युरोपियन इमारत आहे की, जिने कचेरीच्या प्रवेशद्वारी गणपतीचा मोठा पुतळा उभारला आहे. कोकणातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. आराध्य दैवत म्हणून श्री गणेशाची उपासना कोकणात फार पूर्वीपासून सुरू आहे. प्रत्येक कोकणी माणूस गणेशोत्सव आला की, आपल्या गावी जाणारच. कोकणातील गणपतीची काही स्थानं अत्यंत सुंदर देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र आहेत.

श्री लंबोदर-गणपतीपुळे

हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍याचा द्वारपाल असा मुद्गल पुराणात ज्याचा उल्लेख आढळतो तो गणपतीपुळ्याचा प्रसिद्ध गणपती लाखो भाविकांकडून पूजिला जातो. गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनार्‍याला लागूनच असलेली उंच टेकडी हाच गणपती मानला जातो. या टेकडीची प्रदक्षिणा हीच गणेशाची प्रदक्षिणा मानली जाते. अनेक गणेश भक्तांनी येथे गणेशाची तपश्चर्या केली आहे आणि त्यातील काही सत्पुरुषांच्या समाध्या येथेच आहेत.

गलबतवाल्यांचा गणपती-गणेशगुळे

पावसपासून पाच किमी अंतरावर हे देवस्थान आहे. पावसचे रामचंद्रपंत चिपळूणकर यांनी पोटशुळाची व्याधी बरी होण्यासाठी गणेशाच्या दृष्टांतानुसार येथे या गणेशाची स्थापना केली. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनाने व्याधी दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे.

श्री दशभुजासिद्ध लक्ष्मी गणेश- हेदवी-ता. चिपळूण

हे गणपती मंदिर पेशवेकालीन आहे. मंदिरातील संगमरवरी मूर्ती अत्यंत नयन मनोहर असून साडेतीन फूट उंचीच्या आसनावर अधिष्ठित आहे. गणेशमूर्ती दशभुज आहे.

नेरूर गणपती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सावंतवाडीपासून सुमारे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर नेरूर हे गाव आहे. तिथे सुमारे अडीचशे वर्षाहून अधिक काळ गणेशोत्सव साजरा होत असून नेरुरकर कुलकर्णी घराण्याने आणि गावाने ऐतिहासिक ठेवा निगुतीनं जतन केला आहे. गाळव चिकणमातीची बनविलेली सुबक मूर्ती हे इथल्या गणेशमूर्तीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

  • बाल गणपती, तरुण गणपती, भक्ती विघ्नेश्वर, वीर विघ्नेश, शक्ती गणेश, लक्ष्मी गणपती, उच्छिष्ट गणपती, महागणपती, उर्ध्व गणपती, पिंगळा गणपती, हेरंब गणपती, प्रसन्न गणपती, उन्मत्त गणपती, विघ्नराज गणपती, भुवनेश गणपती, नृत्य गणपती, हरिद्रा गणपती, भालचंद्र गणपती, शूर्पकर्ण, एकदंत अशा श्री गजाननाच्या 21 मूर्तींचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतं. महाराष्ट्र शासनानं गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिल्यामुळे शिल्पकारांनाही आता विविध मूर्ती साकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news