Dementia| ‘स्मृतिभ्रंशाचा’ विळखा घट्ट; राज्यातील १० लाख ज्येष्ठ नागरिक आजाराने त्रस्त

सामाजिक, आरोग्य आणि कौटुंबिक पातळीवर उपचार मिळाल्यास स्मृतिभ्रंशाची पकड सैल होणे शक्य
Dementia in Senior Citizens
Dementia in Senior CitizensPudhari
Published on: 
Updated on: 

अनुपमा गुंडे

ठाणे : आयुष्याच्या उत्तरायणात घोंगावणाऱ्या आजारात आता ‘स्मृतिभ्रंशाच्या’ विळख्याची भर पडते आहे. अल्झामायर रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जगात ५ कोटी ७० लाख ज्येष्ठ स्मृतिभ्रंशाने (डिमेंशिया) ग्रस्त असून, भारतात सुमारे ७२ लाख ज्येष्ठांच्या लोकसंख्येला या आजाराने ग्रासले आहे. महाराष्ट्रात सुमारे १० लाख ज्येष्ठ या आजाराचा सामना करत आहेत. प्राथमिक पातळीवर स्मृतिभ्रंशाचे निदान झाल्यावर योग्य ती काळजी, उपचार सामाजिक, आरोग्य आणि कौटुंबिक पातळीवर उपचार मिळाल्यास स्मृतिभ्रंशाची पकड सैल होण्याची शक्यता असल्याचे सोसायटीचे मत आहे.

पाळी गेल्यानंतर शरीरातील संरक्षित संप्रेरके कमी होतात. त्यामुळे महिलांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण अधिक आहे. पाश्चात्य देशात स्मृतिभ्रंशाचा आजार ही मोठी समस्या आहे. जपान, अमेरिका अशा विकसित देशांचा यात समावेश आहे. ग्रामीण भागात स्मृतिभ्रंशाच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

डिमेंशियाचे प्रकार

अल्झायमर डिमेंशिया : स्मरणशक्ती कमी होते, नवीन शिकवलेल्या गोष्टी लक्षात राहात नाही, निर्णय घेणे, सारासार विचार करणे या गोष्टी कमी होतात.

व्हॅस्क्युलर : रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूच्या उच्च प्रतीच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे शरीराच्या चालण्याच्या हालचालींचा अंदाज घेता येत नाही.

लेवी बॉडी : कानांचे आणि मनाचे भास होतात. झोप बिघडलेली असते.

फ्रंटोटेम्पोरल : संभाषणावर, शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. कळते, परंतु बोलण्यासाठी शब्द सुचत नाही, त्यामुळे चिडचिड वाढते.

पूर्वी समाजकल्याण केंद्रे चालविली जात. अशी केंद्रे सरकारने पुन्हा सुरू करायला हवीत. यात वाचनासाठी पुस्तके, चित्रपट दाखविण्याची सोय, छोटा बगीचा दिल्यास त्यांचा वेळ चांगल्या पद्धतीने घालविता येईल. स्मरणशक्ती केंद्रेही असायला हवीत.
- डॉ. संजय कुमावत, मानसोपचार तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news