

ठाणे : गेल्या सात-आठ वर्षात बिबट्यांची संख्या चारपट वाढली असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्याप्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढली आहे. आता नाशिकमध्ये वाढले आहेत. आतापर्यंत वस्ती, गावात हैदोस घालणाऱ्या २५० बिबटयांना जेरबंद करण्यात आले असून त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. लवकरच जिल्हानिहाय बिबट सफारी, व्याघ्र सफारी सुरू केली जाणार असल्याचे सांगून वनमंत्री गणेश नाईक यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथे तीन बिबट्यांची शिकार करणाऱ्या आरोपींचे आंतराष्ट्रीय टोळीशी कनेक्शन उघड झाल्याचे ठाण्यात सांगितले.
दरम्यान, यापूर्वी अमराठी व्यक्तींना रिक्षा, टॅक्सिचे परवाने देण्याची आपण केलेली चूक सुधारताना त्यांना मराठी शिकण्यासाठी एक-दोन महिन्यांची मुदत द्यायला हवी, मनात आलं आणि लगेच लहरीने केलं हे उचित नाही, ते अन्यायकारक आहे, अशी रोखठोक भूमिका घेत नाईक यांनी सरकारला घराचा आहेर दिला.
वनमंत्री तसेच ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये जनता दरबार झाला. या दरबारात नागरिकांच्या २१७ तक्रारींवर मंत्री नाईक यांनी प्रत्यक्ष सुनावणी घेत प्रश्न सोडविण्याचा प्रयन्त केला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना वनमंत्री गणेश नाईक यांनी १ मे पासून अमराठी रिक्षा , टॅक्सी चालकांना मराठी बोलता, वाचता न आल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
नामदार नाईक म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यावसायिकाला मराठी आलेच पाहिजे, अन्यथा त्यांना व्यवसायाला परवाना देऊ नये. पण यापूर्वी मराठी येत नसलेल्या व्यक्तींना परवाने, परमिट देण्याची आपण केलेली चूक सुधारण्यासाठी कुठलीही नोटीस न बजावता, मराठी शिकण्यासाठी एक दोन महिन्याची मुदत न देता तातडीने परवाना रद्द करण्याची भूमिका ही अन्यायकारक आहे. मराठी येते की नाही याचे प्रमाणपत्र देणारी यंत्रणा उभी करायला हवी, ती कुठे आहे ? कुणाच्या मनात आले आणि लहरीने केले हे उचित नाही, असे म्हणत नाईक यांनी १ मेपासून अमराठी रिक्षा, टॅक्सिचालकांचे परवाने रद्द करण्याच्या परिवहन मंत्री सरनाईक यांच्या भूमिकेबाबत असहमती दर्शवली.
येऊर येथे वानरांना बाण मारून जखमी करण्याचे प्रकार घडत असल्याची बाब मान्य करीत वनमंत्री नाईक यांनी येऊर येथील तीन बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे सांगितले. या प्रकरणी पाच आरोपींना अटक झाली असून त्यापैकी तीन आरोपी हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाड्यांमध्ये राहणारे आहेत. तर दोन आरोपी बाहेरचे असून या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे उघड झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला संरक्षण भिंत घालण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला आहे. सर्व झोपड्याधारकांना नॅशनल पार्कमधून काढले जाणार असून त्यांना घरे देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.