

ठाणे : गेली ३७ वर्षे कळवा येथील मफतलाल इंजीनियरिंग इंडस्ट्रीचे कामगार लढा देत आहेत. अचानक कंपनी बंद झाल्याने हे कामगार न्यायापासून वंचित आहेत. त्यांनी बुधवारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले.
कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल ३७ वर्षे उलटली तरीही हजारो कामगारांना न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केली आहे. २७ मे १९८९ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली आणि २२०३ कामगारांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळली.
"जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर थकबाकी द्यावी. झोपडपट्ट्या आणि पार्किंगमधून आर्थिक व्यवहार सुरू असताना कामगार मात्र न्यायापासून वंचित आहेत," अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.
आचारसंहिता संपल्यानंतर या विषयावर अधिक भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामगारांच्या म्हणण्यानुसार, अन्यायाची मालिका १९८६ पासूनच सुरू झाली होती. त्या काळात ९२३ कामगारांना सक्तीने निवृत्त करण्यात आले. २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिक सेवा बजावलेल्या कामगारांना अपमानास्पद पद्धतीने बाहेर जावे लागले.
तत्कालीन कामगार नेते तथा स्वातंत्र्यसैनिक आप्पा सामंत यांनी ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना सन्मानाने कामावर सामावून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र व्यवस्थापनाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर १९८९ मध्ये उर्वरित सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले.
१९९० साली कामगारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र कंपनीचे कथित गैरव्यवस्थापन आणि मालकांचा निष्क्रियपणा यामुळे कंपनी पूर्णतः बंद पडली असा आरोप मफतलाल कंपनीचे कामगार सतीश मनवल यांनी केली आहे. कामगारांचे वेतन, पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर कायदेशीर देणी प्रलंबितच राहिली. गेल्या तीन दशकांत दीड हजारांहून अधिक कामगारांचे निधन झाले असून उर्वरित कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
न्यायालयीन आदेश होऊनही मालकाने कोणतेही कायदेशीर देणे देण्यास किंवा कंपनी पुन्हा सुरू करण्यास स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी १९९९ रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर न्यायमूर्ती काथावाला यांच्या आदेशानुसार कंपनी परिसराला कुंपण घालण्यात आले. जागेच्या विक्रीसाठी तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र एकाही विकासकाने प्रतिसाद दिला नाही.