बदलापुरातील (Badlapur School Case) ज्या शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाला; त्या शाळेतील सीसीटीव्ही डीव्हीआर (CCTV DVR) स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला. तसेच स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या विविध अंगाने तपास करत आहे. गुन्हे शाखेचे एक पथक शाळेत गुरुवारी सकाळीच दाखल झाले. त्यांनी विविध बारकाव्यांचा अभ्यास करून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आणि त्यानंतर शाळेच्या परिसरात आजूबाजूला असलेले सीसीटीव्हींचे डीव्हीआर पोलीस तपासून पाहत असून ते डीव्हीआर स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. ही घटना घडण्यापूर्वी तसेच घटना घडल्यानंतर आणि आंदोलनादरम्यान शाळेची झालेली तोडफोड या साऱ्याचे रेकॉर्डिंग या डीव्हीआरच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती लागले आहे. (Badlapur school sexual abuse)
बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मंगळवारी संतापाचा मोठा उद्रेक झाला होता. यात शाळेत काही भागातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पालकांच्या असंतोष आणखीनच वाढला होता. त्यामुळे थेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शाळेत येऊन विविध विभागातील आणि कार्यालयातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग तपासून डीव्हीआर ताब्यात घेण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांचा शाळेभोवती खडा पहारा असून डीव्हीआर तपासणीनंतर यातून पोलिसांच्या हाती काय लागते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.