Legislative Assembly Elections 2024 : ठाणे भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच

vidhansabha election 2024 : ठाणे विधानसभा मतदार संघात निवडीसाठी नवेनवे प्रयोग
Legislative Assembly Elections 2024 : ठाणे भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच
Published on
Updated on

ठाणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नसल्याने आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीसाठी वरिष्ठ पातळीवर नवेनवे प्रयोग करण्यात येत आहेत. यामध्ये चिठ्ठयांचा प्रयोग फारसा रुचला नसल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये तगडा उमेदवार उभा करण्याची रणनीतीवर भर दिला जात आहे.

ठाणे विधानसभा मतदार संघात महायुतीचा विजय निश्चित मानला जात असल्याने या ठिकाणी इच्छुकांची संख्या देखील अधिक असली तरी, उमेदवारी देताना यावेळी भूमिपुत्रांचा देखील विचार व्हावा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.

ठाणे विधानसभा हा सध्या भाजपच्या ताब्यात असून, या ठिकाणी संजय केळकर हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदार संघावर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही दावा करण्यात येत आहे. हा मतदार संघ भाजपकडून आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे कसून प्रयत्न सुरू आहेत, तर उबाठा पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. मनसेनेही या मतदार संघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला जात आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान भाजपा आमदार संजय केळकर यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. परंतु भाजपमध्येच त्यांच्या नावाला काहींचा विरोध आहे. तर यावेळी भूमिपुत्र उमेदवार या ठिकाणी देण्यात यावा असा मोठा मतप्रवाह देखील सध्या पक्षात सुरू असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून काही किरकोळ अपवाद वगळता स्थानिक राजकारणात भूमिपुत्रांवर वेळोवेळी अन्याय झाला असल्याने येणार्‍या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. 1978 साली ठाणे विधानसभेतून जनसंघाचे गजानन कोळी हे निवडून गेले होते. मात्र त्यानंतर भाजपकडून भूमिपुत्रांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे लगतच्या रायगड जिल्ह्यात भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही आशेचा किरण दिसू लागला आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला टक्कर देण्यासाठी प्रभावी नेतृत्व तयार करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, अशी अपेक्षा होती.

संजय केळकर हे आधी कोकण पदवीधर आणि नंतर सलग दोन वेळा ठाणे विधानसभेतून निवडून आले असल्याने यंदा या ठिकाणी भूमिपुत्र असलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी आता पुढे आली आहे.

या मतदार संघातील महागिरी, राबोडी, बाळकुम, कोलशेत,ढोकाळी हे आगरी आणि कोळी समाजाचे गड समजले जातात. या मतदार संघात काँग्रेसने कांती कोळी यांना मैदानात उतरवले होते. काँग्रेसकडून दोनदा भूमिपुत्रांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्यात आले होते. ठाणे विधान सभा क्षेत्रात आगरी आणि कोळी मतदारांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यात व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. राजेश मढवी यशस्वी ठरू शकतात, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.

दुसरीकडे प्रदेश सचिव अ‍ॅड. संदीप लेले, सुजय पतकी हे देखील उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते. शहर अध्यक्ष संजय वाघुले हे पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे या संधीचा फायदा घेत ठाणे मतदार संघात मराठा उमेदवारास लॉटरी लागू शकते अशी चर्चा आहे.

मात्र या मतदार संघाला असलेला आगरी, कोळी आणि भूमिपुत्रांचा इतिहास असल्याने या ठिकाणी हाच प्रयोग यशस्वी ठरेल, असा मोठा प्रवाह भाजपमध्ये निर्माण झाल्याने या मतदार संघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झालेली दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news