

मिरा रोड : तरुणांना लाओस या देशात सायबर गुलामगिरी करण्यासाठी पाठवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1, काशिमीरा यांनी पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी एका एजंटला अटक केली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील काही एजंटनी मिळून लाओस येथे ऑनलाईन कॉल सेंटरमध्ये चांगल्या पगाराची नोकरीवर लावण्याचे आमिष दाखवून इस्माईल इब्राहीम सय्यद याला थायलंडमार्गे अवैधरीत्या लाओस येथे पाठवले असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष 1 यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित इसम ईस्माईल इब्राहिम सय्यद यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेवून अधिक चौकशी केली. त्यांनी नयानगर परिसरात रहाणारा आरोपी समीर शेख व आमीर खान तसेच, सागर गौतम मोहीते ऊर्फ ॲलेक्स ऊर्फ क्रिस, रा. काशिमीरा यांनी आपसांत संगनमत करून पीडित इसम ईस्माईल इब्राहिम सय्यद तसेच, शाबान अली, रा. नयानगर व लकी अली, रा. गुजरात यांना त्यांची पिळवणूक करण्याच्या इराद्याने मुंबई येथून थायलंड मार्गे अवैधरीत्या लाओस या देशात पाठवून मानवी तस्करी केली असल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर, लाओस या देशातील सायबर फ्रॉड करणाऱ्या कंपनीमध्ये चायसन या चिनी वंशाच्या व्यक्तीने त्यांची भरती करून घेतली. त्यानंतर त्यांना भारतीय मुलींच्या नावाने फेसबुकवर खाते उघडून परदेशातील भारतीय लोकांशी फ्रेंडशिप करण्यास सांगितले. तसेच त्यांना विश्वासात घेवुन त्यांना पैसे गुंतवणूक करायला सांगून त्यांची फसवणूक करण्याचे काम करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यावेळी पीडित इसमांनी हे काम करण्यास नकार दिला असता त्यांचे पासपोर्ट फाडण्याची, तसेच त्यांना मारून टाकण्याची भिती घालून त्यांना त्या इमारतीच्या बाहेर जाण्यास मनाई केली.
याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत 3 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष 1 यांनी यातील एजंट आमिर सोहेल नईम एहमद याला नयानगर येथून अटक करण्यात आली असून इतर आरोपीचा शोध सुरु आहे.