

Kolhapur Sangli Satara Economic Zone
ठाणे : कोल्हापूर शहराचा समावेश करून ग्लोबल कॉम्पिटिव्हिटी सेंटरची स्थापना, कोल्हापूर, सांगली व सातारा या भागाचा इकॉनॉमिक झोन म्हणून विकास करून या परिसरातील औद्योगिक क्षमता, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविण्यावर भर देत उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी गडहिंग्लज, नवापूर, नांदगाव आणि वाशिम येथे नवीन एमआयडीसी स्थापन करण्याबाबत आज ठाण्यात झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.
उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विविध जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेण्यात आल्या. औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, भूसंपादन, नवीन एमआयडीसी क्षेत्रांची स्थापना, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार डॉ. मनीषा कायंदे, किसन कथोरे, आमश्या पाडवी, राजेश पाडवी, राजेश मोरे, संजय गायकवाड, अमित झनक, लहू कानडे, सुधीर मुनगंटीवार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने उपस्थित होते.
यावेळी खंडाळा टप्पा क्र. ३ औद्योगिक क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे, लोणंद औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, कोरेगाव तालुक्यातील मौजे तळवडे येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणे तसेच अतिरिक्त फलटण औद्योगिक क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
फलटण औद्योगिक क्षेत्रातील मुंढवडे क्र. सी-२ मधून नांदल गावातील शेतकऱ्यांना बायपास रस्ता उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. खालापूर व कर्जत तालुक्यातील एमआयडीसी भागासाठी भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याबाबत तसेच नवापूर, जि. नंदुरबार येथील सहा ते सात शेतकऱ्यांना एमआयडीसीसाठी जमीन द्यायची नसल्याबाबतच्या विषयांचाही आढावा घेण्यात आला.