

सापाड : योगेश गोडे
शहापूर तालुक्यातील किन्हवली गावातील श्री हिंगलाज माता मंदिर हे सुमारे 400 वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक मंदिर असून आजही स्थानिकांसाठी आस्था, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे.
मंदिराच्या प्राचीनतेचा दाखला देताना मंदिर समितीचे अध्यक्ष जयेश अनिल भानुशाली यांनी सांगितले की, येथे नियमित धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवांचे आयोजन केले जात आहे. शारदीय नवरात्र उत्सव व पौष पौर्णिमा हे महत्त्वाचे सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे केले जातात.
नवरात्रोत्सव काळात देवीची अलंकारिक सजावट, दररोजचा महाआरती कार्यक्रम, भजन-कीर्तन, गजरे व देवीची मिरवणूक या सोहळ्यांना भाविकांची मोठी गर्दी होते. पौष पौर्णिमेला खास पूजा केली जाते. किन्हवली आणि आसपासच्या गावातील नागरिकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. नवरात्र व पौष पौर्णिमेला विशेष भक्तीभावाचा माहोल तयार होतो. महाराष्ट्रातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिराची भक्तांना शांती, शक्ती आणि आध्यात्मिक ऊ र्जा प्रदान करणारे ठिकाण म्हणून ख्याती आहे.
आध्यात्मिक वातावरण
मंदिराची रचना साधी परंतु भक्तीभावनेने समृद्ध आहे. गाभार्यात देवीची प्रतिमा शिला रूपात विराजमान आहे. मंदिरासमोर मंडप, आरतीसाठी जागा आणि सभोवताली भक्तांना बसण्यासाठी ओसरी आहे. सणाच्या वेळी मंदिर परिसर फुलांच्या तोरणांनी व दिव्यांनी सजवला जातो. किन्हवली व आजूबाजूच्या गावांतील लोकांसाठी हे मंदिर फक्त धार्मिक नाही, तर सामुदायिक एकतेचे केंद्र आहे. सण-उत्सव काळात गावकरी एकत्र येऊन समाजोपयोगी उपक्रम, अन्नदान, आरोग्य शिबिरे, भजन संध्या आयोजित करतात. स्थानिक लोकांच्या श्रद्धेमुळे मंदिराभोवती एक विशेष आध्यात्मिक वातावरण निर्माण होते.