

Anti Corruption Action KDMCl
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या तिघाही लाचखोरांना प्रशासनाने अखेर निलंबित केले. गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत लाचखोरीच्या प्रकरणांत आतापर्यंत ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जेलवारी झाली आहे. एकाच दिवशी घनकचरा आणि जलनिस्सारण विभागातील एकूण तीन अधिकारी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात लाच घेताना रंगेहाथ सापडले. हे तिन्ही अधिकारी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशांवरून सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी निलंबित केले आहेत.
राज्यातील एकूण २७ महापालिकांमधील सर्वाधिक लाचखोर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांत अधोरेखित झाले आहे. दरवर्षी एक-दोन जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले जातात. तरीही या महानगरपालिकेतील लाचखोरांची हाव संपताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम, लेखा अभियांत्रिकी, नगररचना, शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालकल्याण, समाज विकास या विभागांत आर्थिक उलाढाली होत असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. गेल्या महिन्यातील २४ तारखेला निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले सहाय्यक अभियंता रविंद्र भीवसन अहिरे (५७) यांनी राजाराम माने (रा. सांगली) यांच्याकडे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी जल व मलनिस्सारणाचा ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ६० हजारांची मागणी केली होती.
तडजोडीअंती ४० हजार रूपयांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या जाळ्यात रविंद्र अहिरे सापडले. अहिरे यांना बिर्ला महाविद्यालय समोरच्या रस्त्यावर लाच घेताना रंगेहाथ पकडले असतानाच, त्याच दिवशी घनकचरा विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता निरीक्षक (सफाई कामगार) सुदर्शन जाधव हे दोघेही ब प्रभागाचे सफाई कर्मचारी विनोद वाघेला या सफाई कामगाराकडून २० हजार रूपयांची लाच घेताना पत्रीपुलाजवळील सर्वोदय माॅलमधील कार्यालयात रंगेहाथ सापडले.
विनोद वाघेला याची प्रकृती ठीक नसल्याने ते अनेक दिवस कामावर गैरहजर होते. या कामगाराला हजर करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी मुख्य स्वच्छता अधिकारी देगलूरकर आणि स्वच्छता निरीक्षक जाधव हे दोघे सफाई कामगाराकडे ३० हजार रूपयांची मागणी करत होते. तडजोडीने ही रक्कम २० हजार रूपयांवर करण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक अनुपमा खरे यांनी देगलूरकर आणि जाधव यांना रंगेहाथ पकडले. सहाय्यक अभियंता रविंद्र अहिरे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर आणि स्वच्छता निरीक्षक सुदर्शन जाधव हे तिन्ही अधिकारी ४८ तासांहून अधिक काळ कोठडीत होते. त्यामुळे प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
क प्रभागातील एका कर्मचाऱ्याने मालमत्ता कर लावण्याच्या प्रकरणात एका महिलेकडे लाच म्हणून शरीरसुखाची मागणी केली होती. अशा पद्धतीने लाच मागण्याचा प्रकार राज्यात प्रथमच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घडला आहे. केडीएमसीत पहिला लाचखोर अधिकारी तुकाराम संख्ये जाळ्यात अडकला होता. हा अधिकारी सन १९९५ दरम्यान अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात पर्यवक्षक म्हणून कार्यरत होता. बेकायदा बांधकामाला संरक्षण देण्यासाठी पंधराशे रूपयांची मागणी करणाऱ्या या अधिकाऱ्याला लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. याच महापालिकेतील सर्वाधिक लाचखोर अधिकारी म्हणून सुनील जोशी म्हणून ओळखले जातात. लाचखोरीच्या प्रकरणात केडीएमसी आतापर्यंत ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
भ्रष्टाचाराची बजबजपुरी ठरलेल्या या महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीत अर्धशतक झळकावून रेकॉर्ड ब्रेक करण्याची तयारी करत आहेत की काय ? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.