

KDMC Tax Clerk Bribe
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा काळा डाग लागला आहे. कर भरा, पण कामासाठी लाच द्या, अशी अवस्था झाल्याने करदाते कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त आहेत. याच पुरावा म्हणजे बी वॉर्ड कार्यालयातील कर विभागाचा लिपिक सिद्धार्थ बोराडे याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या एका कारवाईसोबतच केडीएमसीमधील लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या आता थेट अर्धशतकावर जाऊन पोहोचली आहे.
तक्रारदाराचे घरपट्टीचे काम रखडले होते. ते मार्गी लावण्यासाठी कर विभागातील लिपिक सिद्धार्थ बोराडे याने सहा हजार रूपयांची मागणी केली. कामासाठी पैसे मागताच तक्रारदाराने संयम सोडला आणि थेट ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे दार ठोठावले. लाच विरोधी पोलिसांनी तक्रारीची गुप्त पडताळणी केली. लाच मागितल्याचे स्पष्ट होताच सापळा रचण्यात आला. ठरलेल्या ठिकाणी लाचेची रक्कम हाती पडताच सिद्धार्थ बोराडे यांना पथकाने चारी बाजूंनी घेरले आणि रंगेहात ताब्यात घेतले.
ही घटना म्हणजे अपवाद नाही तर केडीएमसीच्या रोजच्या कारभाराचे वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकाम विरोधी विभाग, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण, कर, आदींच्या विभागातून लाचखोरीच्या तक्रारींचा पाऊस पडतो आहे. लहानसहान दाखल्यापासून ते मोठ्या परवानग्यांपर्यंत प्रत्येक कामासाठी नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. आता लाचखोरांचा आकडा पन्नासच्या घरात गेल्याने महानगरपालिकेची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली आहे.
कर विभागाचा लिपिक सिद्धार्थ बोराडे याला रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळेवर कर भरतो, तरीही आमची कामे अडवून लाच मागितली जाते. ही कोणती लोकशाही ? असा सवाल आता थेट सभागृहापासून रस्त्यावर पोहोचला आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच लिपिकांची हिंमत वाढत असल्याचा आरोपही केला जात आहे.
ठाण्याच्या लाचविरोधी पोलिसांनी लाचखोर सिद्धार्थ बोराडे याच्याविरोधात स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून वरिष्ठांच्या सहभागाबतही माहिती घेतली जात आहे. या धडक कारवाईमुळे केडीएमसीच्या सर्व विभागांमध्ये एकच खळबळ माजली आहे. अनेकजण फायली आवराआवर करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत वरपासून खालपर्यंत पारदर्शकता येत नाही आणि कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. पिडीतांनीही घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात येत आहे. केडीएमसीने आता तरी डोळे उघडून आत्मपरीक्षण करावे. नाहीतर लाचखोरांचे शतकही लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही, असाही अंदाज तज्ज्ञांकाढून वर्तविण्यात येत आहे.