Stray dog ​​bite : कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; साडेपाच वर्षात १ लाखाहून अधिक नागरिकांचे तोडले लचके

नसबंदीवर साडे पाच कोटी खर्च करूनही भटक्या कुत्र्याच्या संख्येवर आळा बसेना
Stray dog ​​bite
Stray dog ​​bite
Published on
Updated on

सतीश तांबे

कल्याण : पावसाळा सुरू झाला की मोकाट भटक्या कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. कल्याण डोंबिवली क्षेत्रात रविवार आणि सोमवार या दोन दिवसात भटक्या कुत्र्यांनी सव्वाशे ते दीडशे लोकांना चावा घेत लचके तोडले असून भटक्या कुत्र्याच्या भीतीने नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुद्धा भीतीदायक झाले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या २० ते २५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात गेल्या साडेपाच वर्षात १ लाख १२ हजार १११ नागरिकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत .पालिकेने गत साडेपाच वर्षात कुत्र्याच्या नसबंदीसाठी ५ कोटी ३४ लाख ३७ हजार ७६० रुपये खर्च केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भटक्या कुत्र्याच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी केडिएमसी प्रशासनाकडून कुत्र्यांच्या नसबंदीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च उधळला जातो, असे असताना भटक्या कुत्र्याची संख्या कमी होण्याऐवजी ती अधिक वाढत चालली आहे. घोळक्याने संचार करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने रेबीजची इंजेक्शन घेण्यासाठीच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन वर्षाकाठी अंदाजे सव्वा कोटी रुपये खर्च करीत असताना ही संख्या आटोक्यात आणण्यास प्रशासन अपयशी ठरली आहे.

शहरातील रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, कचरा-कुंड्या, उकिरडा, तसेच रस्त्याच्या कडेला सात ते आठ भटक्या कुत्र्यांचे टोळके टोळक्याने जमलेले असतात. सार्वजनिक ठिकाणी व संपूर्ण शहरात फिरताना दिसतात. ग्राम व्याग्र म्हणजेच भटक्या कुत्र्याच्या वाढत्या संख्येने रात्रीच्या सुमारास काम वरून येणाऱ्या नोकरदार वर्गाला रस्त्याने एकट्याने या जा करणे सुद्धा जीवावर बेतत असते कोणत्याही क्षणी भटके कुत्रे मागून येऊन चावा घेतील, यांची तिळमात्र शंका नसल्याने ते भीतीच्या छायेत वावरत असतात. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दररोज २० ते २५ आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात १० ते १५ नागरिक श्वान चावल्यानंतर उपचारासाठी येतात. काही नागरिक कुत्र्यांनी चावा घेतलेले रुग्ण पालिका व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात . पालिका प्रशासन भटक्या कुत्र्याच्या नसबंदी साठी कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना मात्र या भटक्या कुत्र्यांच्या संख्या कमी होत नसून अधिकच वाढत चालली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत जानेवारी २०२१ ते जून २०२६ या साडे पाच वर्षाच्या कालावधीत सुमारे १ लाख १२ हजार १११ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेत लचका तोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महापालिकेने कुत्र्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, कुत्र्यांना पकडण्याची मोहिम आणि नियंत्रण करण्यासाठीचा ठेका एका खाजगी कंपनी दिला आहे .एका कुत्र्याच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रति ९८९ रुपये खर्च दिला जात असून वर्षाला कुत्र्याच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च केला जात आहे. तसेच कुत्रा चावल्यावर प्रतिबंध लस दिली जाते, या रेबीजच्या इंजेक्शनावर प्रती वर्षी पन्नास लाख रुपये खर्च केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करूनही पालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यावर आवर घालण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे.

श्वान निर्बीजीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवून प्रकल्प आणखीन प्रभावीपणे राबविणार : आयुक्त अभिनव गोयल

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ८० हजार भटके कुत्रे आहेत. त्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेचे श्वान निर्बीजीकरण प्रकल्प सुरु असून प्रकल्पाचे काम एका एजेन्सीला दिले आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढवून आणखीन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. येत्या चार वर्षात ८० हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रभावी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.

महापौर चौधरी यांनी सांगितले की, श्वान निर्बीजीकरणाची क्षमता वाढविण्यासोबत भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणावर ही भर दिला जाणार आहे. त्यासाठी दोन ते तीन प्राणीमित्र समाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.

Pudhari

साडेपाच वर्षात

श्वान दंश १,१२,१११

नसबंदी ५,३४,३७,७६०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news